मौलाना महमूद मदनी, प्रो. सलीम इंजिनिअर, मौलाना असगर अली इमाम महदी सलफी
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण देशाला खोलवर शोकात बुडवले आहे. ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनाने केवळ घरे आणि व्यवसायच उद्ध्वस्त केले नाहीत, तर असंख्य आयुष्येही उद्ध्वस्त केली आहेत. या कठीण काळात, देशातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरूंनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि सर्व नागरिकांना एकत्र येऊन पीडितांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.
ही वेळ एकत्र उभे राहण्याची - मौलाना असगर अली इमाम महदी सलफी
जमियत अहले हदीस हिंदचे प्रमुख मौलाना असगर अली इमाम महदी सलफी यांनी उत्तरकाशीतील या दुर्घटनेला अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, "ही वेळ आपापसातील मतभेद विसरून पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे."
ते पुढे म्हणाले, "या आपत्तीने आपल्या सर्वांना आतून हादरवून सोडले आहे. ज्यांनी आपली घरे, प्रियजन आणि उपजीविका गमावली आहे, त्या सर्वांप्रति आमच्या संवेदना आहेत. आम्ही प्रार्थना करतो की अल्लाह हे संकट लवकर दूर करो आणि उत्तरकाशीचे लोक पुन्हा सामान्य जीवनाकडे परतू शकतील."
त्यांनी मदत आणि बचावकार्यात गुंतलेले सैनिक, आपत्ती व्यवस्थापन दल आणि सरकारच्या प्रयत्नांचेही कौतुक केले आणि सर्व भारतीयांना या कठीण काळात माणुसकीच्या नात्याने उत्तरकाशीच्या लोकांसोबत उभे राहण्याचे आवाहन केले.
धारलीची घटना अत्यंत दुःखद - मौलाना महमूद मदनी
जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी उत्तरकाशीच्या धारली गावात आलेल्या पुरामुळे झालेल्या भीषण विनाशावर तीव्र शोक व्यक्त केला.
"ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती नाही, तर एक मानवी शोकांतिका आहे. आम्ही जमियतच्या उत्तराखंड युनिटला आवाहन करतो की, त्यांनी स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संघटनांसोबत मिळून मदतकार्यात सक्रियपणे सहभागी व्हावे."
त्यांनी सरकारकडे मागणी केली की, डोंगराळ भागांसाठी एक मजबूत आपत्ती व्यवस्थापन धोरण तयार केले जावे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देता येईल.
माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म - प्रो. सलीम इंजिनिअर
जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष प्रो. सलीम इंजिनिअर यांनी सोशल मीडियावर संवेदना व्यक्त करताना म्हटले की, "ही वेळ धर्म किंवा जातीच्या भेदभावाची नाही, तर मानवतेची मूल्ये स्वीकारण्याची आहे."
"धारली गावातील विनाश अत्यंत दुःखद आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. लोक बेपत्ता आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही वेळ आहे जेव्हा प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर मदतीसाठी पुढे आले पाहिजे - मग ते दान असो, सेवा असो किंवा केवळ संवेदना असो."
त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, जमातचे स्वयंसेवक स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संघटनांसोबत मिळून प्रत्यक्ष मदतकार्यात गुंतलेले आहेत.
वादळात तेवत ठेवली माणुसकीची ज्योत
अलीकडेच सांप्रदायिक तणावामुळे चर्चेत असलेल्या उत्तरकाशीने देशासमोर आज एक नवीन आदर्श ठेवला आहे. दोन्ही समुदायांनी आपापसातील मतभेद विसरून एकमेकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
ज्या ठिकाणी काही काळापूर्वी 'देवभूमी'च्या नावाखाली मुस्लिम कुटुंबांना पलायन करण्यास भाग पाडले जात होते, तीच भूमी आज सामायिक मानवतेचे प्रतीक बनली आहे.
जेव्हा संकट येते, तेव्हा आपली ओळख आपल्या धर्माने नव्हे, तर आपल्या माणुसकीने होते याची आठवण देवकाशातील उदाहरण संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनली आहे.
उत्तरकाशीची ही भीषण आपत्ती आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की, कठीण काळात जात-पात, धर्म, समुदाय यापलीकडे जाऊन केवळ एकच गोष्ट महत्त्वाची असते - माणुसकी.
आज गरज आहे की, आपण सर्वांनी मिळून मदतीसाठी पुढे आलेल्या हातांना साथ द्यावी, दुःख वाटून घेणाऱ्या भावनांना स्वीकारावे आणि एकत्र येऊन जगाला संदेश द्यावा - ‘आपण सोबत आहोत, आणि नेहमीच राहू.’