'I Love Muhammad' (मला मुहम्मद पैगंबरांवर प्रेम आहे) असे व्यक्त केल्यामुळे काही जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात 'रझा अकादमी' आणि 'मुस्लिम स्टुडंट्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया'ने (MSO) दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. दाखल केलेले गुन्हे मागे घ्या आणि अटक केलेल्या निष्पाप लोकांना सोडा, अशी मागणी या याचिकेत केली आहे.
या कायदेशीर लढाईसोबतच, या दोन्ही संघटनांनी तरुण आणि समाज सदस्यांना शांतता व सलोखा राखण्याचे भावनिक आवाहन केले आहे.
"प्रेषित मुहम्मद यांच्यावरील प्रेम आणि आदर ही प्रत्येकाची वैयक्तिक आणि आध्यात्मिक भावना आहे. शांततेने व्यक्त केल्यास अशा भावनांना गुन्हा मानता येणार नाही. भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देते. या तत्त्वांचे संरक्षण झालेच पाहिजे," असे या संघटनांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
त्याच वेळी, तरुणांना भावनिक प्रतिक्रिया टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. "आम्ही आमच्या तरुण आणि समाज सदस्यांना शांत राहण्याचे आणि सलोखा बिघडवणारी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन करतो. परवानगीशिवाय निदर्शने किंवा संघर्षाची भूमिका घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. संयम, शहाणपण आणि रचनात्मक संवाद हीच आपल्या समाजाची ताकद आहे," असे निवेदनात म्हटले आहे.
अटक करण्यापेक्षा किंवा गुन्हा दाखल करण्यापेक्षा, संवाद आणि सामंजस्याने प्रश्न सोडवणे हाच योग्य मार्ग आहे, असे आवाहनही या संघटनांनी प्रशासनाला केले आहे.
शेवटी, धार्मिक विद्वान आणि समाजाच्या नेत्यांनी तरुणांना आपल्या श्रद्धेचे प्रदर्शन शांततेच्या मार्गाने करण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि कायदेशीर व लोकशाही मार्गानेच न्यायासाठी लढावे, असेही आवाहन करण्यात आले. "प्रेषित यांची शिकवण लक्षात ठेवली पाहिजे. शांती, संयम आणि करुणा ही राग आणि संघर्षापेक्षा अधिक शक्तिशाली आहे," असेही निवेदनात म्हटले आहे.