दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र हाय अलर्टवर!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दिल्लीत सोमवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई, पुणे आणि नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, ठिकठिकाणी नाकाबंदी आणि कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत 'त्रिस्तरीय' सागरी सुरक्षा, रेल्वे स्थानकांवर तपासणी

दिल्लीतील बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व सहआयुक्तांची तातडीची बैठक बोलावून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या बैठकीला सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि सहआयुक्त (प्रशासन) जय कुमार उपस्थित होते.

या बैठकीनंतर, शहरातील संवेदनशील शासकीय, खासगी आस्थापना, प्रार्थनास्थळे, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, मॉल आणि इतर गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेल्वे पोलिस आणि लोहमार्ग पोलिसांचे (GRP) संयुक्त पथक प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा तपास मोहीम राबवत आहे. प्रवाशांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

'त्रिस्तरीय सागरी सुरक्षा व्यवस्था' (Three-tiered maritime security) अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती घेणे आणि प्रत्येक निवासी हॉटेलची तपासणी केली जात आहे. त्यासोबतच, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक आणि शीघ्र कृती दलाला (QRT) तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ माहिती देण्यास सांगितले आहे.

पुण्यात रेल्वे-बस स्थानकांवर 'विशेष वॉच'

पुण्यातही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.

पुण्यातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, मॉल्स, चित्रपटगृहे आणि धार्मिकस्थळांवर पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात बॅग तपासणी आणि बसस्थानकात तपासणी मोहीम सुरू आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून सोशल मीडियावरील हालचालींवरही बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. "शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास निरीक्षण सुरू असून, संशयास्पद व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे," अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली. पुणे पोलिसांनीही, 'कोणतीही संशयास्पद हालचाल, बॅग, वाहन किंवा वस्तू आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी,' असे आवाहन केले आहे.

नागपूर: संघ मुख्यालय, दीक्षाभूमीवर कडक सुरक्षा

दिल्ली स्फोटानंतर उपराजधानी नागपुरातही 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. शहर पोलिस, ग्रामीण पोलिस आणि दहशतवादविरोधी पथकासह (ATS) सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे. विशेषतः, संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमी यांसारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बाजारपेठा, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके आणि बस स्टँडवर पोलिस पथके बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

नागपूर ग्रामीण भागातही हाय अलर्ट असून, रामटेक गडमंदिर आणि जिल्ह्यातील स्फोटके व शस्त्रास्त्र कारखान्यांवरही कडक देखरेख ठेवली जात आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी दिली. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि इतर केंद्रीय गुप्तचर संस्था नागपूर पोलिसांच्या संपर्कात आहेत.

घाबरू नका, सावधगिरी बाळगा

तिन्ही शहरांच्या पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे, पण सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तपासणी कारवाईदरम्यान लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे म्हटले आहे. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अफवा पसरवणे टाळण्याचे आवाहन केले आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter