दिल्ली स्फोटाचा मुस्लिम मान्यवरांकडून तीव्र निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सोमवारी संध्याकाळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे हृदय असलेल्या लाल किल्ला परिसरात, एका भीषण आणि हादरवून टाकणाऱ्या स्फोटाने संपूर्ण देश शोक आणि धक्क्यात बुडाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात आठ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या अमानुष घटनेमुळे देशातील मुस्लिम समाजही खोलवर दुःखी आणि स्तब्ध झाला आहे.

मुस्लिम विचारवंत, धार्मिक विद्वान आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केवळ या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेधच केला नाही, तर दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.

या संवेदनशील काळात, मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींनी देशवासीयांना, विशेषतः मुस्लिमांना, कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे भावनिक आवाहन केले आहे. दिल्ली पोलीस प्रशासन या घटनेबाबत अत्यंत दक्ष असून, सीमा बंद करून कसून तपास करत आहे. स्फोटाची बातमी पसरताच, देशभरातील प्रमुख मुस्लिम व्यक्तींनी एकता, शांतता आणि न्यायाची मागणी करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

आसाममधील प्रसिद्ध सर्जन पद्मश्री डॉ. इलियास अली यांनी दिल्ली स्फोटाचा तीव्र निषेध करत म्हटले की, "अशा घटनेसाठी संपूर्ण मुस्लिम समुदायाला दोषी ठरणे हे देखील तितकेच निंदनीय आहे." डॉ. अली यांनी जोर देत सांगितले की, "इस्लाम हा शांतीचा धर्म आहे आणि त्यात हिंसेला कोणतेही स्थान नाही. जे लोक हिंसा आणि दहशतवादाचा मार्ग निवडतात, ते इस्लामचे अनुयायी नाहीत, आणि मुस्लिम समुदायाने अशा घटकांचा बहिष्कार केला पाहिजे."

माजी सैन्य अधिकारी मेजर मोहम्मद अली शाह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत म्हटले की, "हे खूप दुःखद आहे... उच्च तीव्रतेचा स्फोट... जर हा दहशतवादी हल्ला असेल, तर हा अत्यंत निंदनीय आणि भ्याड हल्ला आहे. माझ्या संवेदना पीडितांच्या कुटुंबांसोबत आहेत."

जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी यांनी या हल्ल्याला "माणुसकीविरुद्धचा घृणास्पद गुन्हा" म्हटले. ते म्हणाले की, ते मृतांच्या कुटुंबांप्रती हार्दिक संवेदना व्यक्त करतात आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतात. त्यांनी अधिकाऱ्यांना सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याचे आवाहन केले.

प्रमुख धार्मिक विद्वान हजरत मौलाना झहीर अब्बास रिझवी यांनी म्हटले की, "मानवी जीविताच्या हानीची भरपाई कोणताही मोबदाला करू शकत नाही." त्यांनी सरकारला आवाहन केले की, मृतांच्या कुटुंबांना पूर्ण सहकार्य द्यावे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा सुनिश्चित करावी, तसेच पोलिसांना तपास पूर्ण करण्याची परवानगी दिली जावी.

अजमेर दर्गा शरीफचे गद्दी नशीन आणि चिश्ती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सैयद सलमान चिश्ती यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मानवता आणि एकतेचा संदेश दिला. ते म्हणाले, "ही भयंकर घटना आपल्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेची आणि हिंसा निष्पाप पुरुष, महिला आणि मुलांना किती खोलवर वेदना देते, याची आठवण करून देते, मग ते कोणत्याही धर्माचे, प्रदेशाचे किंवा राष्ट्रीयत्वाचे असोत." त्यांनी सर्व समुदायांना एकत्र राहण्याचे, प्रार्थना, करुणा आणि सतर्कतेचे आवाहन केले, "जेणेकरून भीती आणि संतापाच्या बीजांना एकता, परस्पर आदर आणि उपचारांच्या बीजांनी बदलता येईल."

इंटर फेथ हार्मनी फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद म्हणाले, "दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ काल झालेला घृणास्पद दहशतवादी हल्ला, जो भारताच्या सार्वभौमत्वावर एक भ्याड आघात आहे, समाजाच्या प्रत्येक वर्गाकडून कोणत्याही सबबीशिवाय, कठोर शब्दांत निंदनीय आहे. या क्रूर कृत्याने असंख्य निष्पाप जीव घेतले आहेत... या गहन शोक आणि संकल्पाच्या क्षणी, आपला सर्वात मोठा देशभक्तीपूर्ण प्रतिसाद हाच आहे की, आपण सर्वांनी एकजूट होऊन एक आवाज बनले पाहिजे."

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटले की, "देशात शांतता आणि सद्भाव याची गरज वाढत असताना समाज विघातक शक्तीही पुन्हा पुन्हा डोके वर काढतानाच्या घटना घडत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. दिल्लीतील लालकिल्याजवळ झालेल्या कार स्फोटात निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आणि अनेकजण जखमी झाले. मात्र या घटनेचा समाजकंटक फायद्यासाठी दुरूपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा संदिग्ध पस्थितीत समाजात घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. या अत्यंत दुःखद, निंदनीय निषेधार्ह घटनेबद्दल मुस्लीम सत्यशोधक मंडळ खेद व्यक्त करून मृतांविषयी सहसंवेदना आणि आदरांजली व्यक्त करते." 

डॉ. तांबोळी यांनी शेवटी आवाहन केले की, "समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांची अशा वेळी अत्यंत सावध आणि समंजस भूमिका घेऊन पोलीस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. अफवांवर लक्ष ठेवून त्याचे निरसन केले पाहिजे. देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने अशा घटनेचा सोयीनुसार वापर करण्यात येतो. देश आणि समाजहित जपण्यासाठी सर्व समाज घटकातील संवाद वाढवणे खूप आवश्यक झाले आहे. आपण एकवटलो तरच विघातक शक्तींना चाप बसेल. "


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter