राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. किमान अकरा जणांचे बळी घेणाऱ्या आणि १५ हून अधिक जणांना जखमी करणाऱ्या स्फोटावर चिंता व्यक्त करताना विरोधी पक्षांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून माहिती घेतल्याचे सरकारच्या सूत्रांनी सांगितले. वर स्फोटाची घटना कळताच गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ दिल्ली पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि न्यायवैद्यक विभागाच्या पथकांना त्वरित घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. गुप्तचर विभागाच्या (आयबी) संचालकांकडूनही गृहमंत्र्यांनी तपशील जाणून घेतला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक असल्याचे म्हटले. राहुल गांधी म्हणाले, "या अपघातात अनेक निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. या शोकाकूल परिस्थितीमध्ये प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांसोबत मी उभा आहे आणि त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. तसेच सर्व जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीतील स्फोटांबद्दल समाज माध्यमातून चिंता व्यक्त केली. खर्गे म्हणाले, "दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. प्रारंभिक अहवालांनुसार या घटनेत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. सरकारने या उच्च सुरक्षा आणि नेहमीच गदों असलेल्या परिसरात झालेल्या स्फोटाची तातडीने आणि सखोल चौकशी करावी, जेणेकरून या निष्काळजीपणासाठी आणि घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना उत्तरदायी धरता येईल."
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनीही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती सहवेदना व्यक्त केली. प्रियांका यांनी म्हटले आहे, की दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याचे समजते. ही बातमी अत्यंत दुःखद आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो. शोकाकूल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना, जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करते."
तत्काळ तपास करा
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची पोलिसांनी तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली. केजरीवाल यांनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, की या स्फोटात अनेक लोकांचा जीव गेला आहे. केंद्र सरकार आणि पोलिसांनी तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणावे. राजधानीच्या सुरक्षेत एवढी मोठी चूक कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाऊ शकत नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, "दिल्लीतील भीषण स्फोटाच्या बातमीने मी अत्यंत हादरले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझे मनःपूर्वक सांत्वन, तसेच सर्व जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते."