आवाज द व्हॉइस विशेष
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघालेल्या जुलूसमध्ये 'आय लव्ह मुहम्मद'लिहिलेले पोस्टर लावल्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्याची अफवा पसरली आणि देशभरात या दडपशाहीच्या कृतीविरोधात निषेध मोर्चे निघायला सुरुवात झाली. विशेषतः उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये निघालेल्या या मार्चमुळे काही ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले. परिणामी मोठ्या प्रमाणावर अटकसत्र सुरू झाले आहे. हा मुद्दा देशातील मुस्लिम विचारवंत आणि प्रमुख संघटनांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या सर्वांनी एकमुखाने अटकेला तीव्र विरोध केला आहे. तसेच या वादाला विनाकारण खतपाणी घालण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे आणि शांतता व घटनात्मक अधिकारांचा सन्मान करण्यावर जोर दिला आहे.
या वादावर देशभरातील काही महत्त्वाच्या धर्मगुरूंनी आणि विचारवंतांनी 'आवाज'कडे प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊयात त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया...
देशाची शांतता टिकवून ठेवावी - मौलाना झहीर अब्बास रिझवी
प्रसिद्ध इस्लामिक विद्वान मौलाना झहीर अब्बास रिझवी यांनी या संपूर्ण वादावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कोणताही धर्म संघर्ष, हिंसा किंवा द्वेषाला प्रोत्साहन देत नाही, यावर त्यांनी भर दिला. शांतता टिकवून ठेवण्याचे आणि पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन करत मौलाना रिझवी म्हणाले की, प्रत्येक धर्माचा सर्वात महत्त्वाचा संदेश 'जगा आणि जगू द्या' हा आहे.
'आवाज'शी बोलताना ते म्हणाले की, "धर्मच माणसाला माणूस बनवतो, पशु नाही. ज्या पूज्य व्यक्तींच्या नावावर अशांतता पसरवली जात आहे, त्या प्रत्यक्षात प्रत्येक धर्माच्या अनुयायांसाठी आदरास पात्र आहेत, अशी आठवणही त्यांनी दिला."
मौलाना रिझवी यांनी स्पष्टपणे सांगितले, "आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. सलोख्याने राहिले पाहिजे. कारण यामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होते."
देशातील वातावरण शांततापूर्ण राहावे आणि सर्व संवेदनशील प्रकरणांमध्ये कायदा व संविधानाचा आदर केला जावा, यावर त्यांनी जोर दिला. कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होऊ नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि घटनात्मक अधिकारांचे हनन होऊ नये, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कारण त्यांच्या मते, एका समृद्ध राष्ट्राची आणि सभ्य समाजाची हीच खरी ओळख आहे.
वादापासून दूर राहावे - सैयद सलमान चिश्ती
अजमेर दर्गा आणि चिश्ती फाउंडेशनचे प्रमुख सैयद सलमान चिश्ती यांनी या संवेदनशील मुद्द्यावर एक संतुलित आणि व्यावहारिक दृष्टिकोन मांडला आहे. ते म्हणाले की, प्रत्येक भारतीयाने कायद्याचा आदर केला पाहिजे, संविधानाचे रक्षण केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या संघर्षापासून किंवा वादापासून दूर राहिले पाहिजे.
सैयद सलमान चिश्ती यांनी दोन्ही बाजूंना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, एकीकडे, 'आय लव्ह मुहम्मद'चा नारा देणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनीही हा संवेदनशील मुद्दा अत्यंत काळजीपूर्वक हाताळला पाहिजे.
त्यांनी सांगितले की, कोणत्याही तरुणाने किंवा आंदोलकाने कायदा आणि संविधानाविरुद्ध काम करू नये. पण त्याचबरोबर, सरकार आणि पोलिसांनी घटनात्मक स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर विशेष जोर दिला. सोशल मीडियावर असो किंवा सार्वजनिक सभा आणि निदर्शनांच्या माध्यमातून, हा अधिकार प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.
या परिस्थितीत काही घटक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे निष्पाप तरुणांवर झालेल्या अन्यायावर होतो. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मुस्लिमांच्या प्रेषितांवरील प्रेमाला संघर्षाचा विषय बनवू नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी केली.
अंतर्गत वादांमुळे जगात भारताची प्रतिमा मलीन होते - असदुद्दीन ओवैसी
या संपूर्ण प्रकरणात एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी जास्त परखड मत व्यक्त केले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत हा वाद वाढवल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये टीका केली आहे. ते म्हणाले की, "पैगंबर मोहम्मद हे इस्लामचे अंतिम प्रेषित होते. कोणताही मुसलमान त्यांना मानल्याशिवाय मुसलमान होऊ शकत नाही."
त्यामुळे ओवैसी यांनी आवाहन केले की, जर मुसलमान 'आय लव्ह मोहम्मद' म्हणत असतील, तर त्याला वादाचा विषय बनवू नये. जर तुम्ही 'लव्ह'ला (प्रेमाचा) विरोध करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही प्रेमाचे विरोधक आहात, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
इतकेच नाही तर पुढे ते म्हणाले, "जर कोणी हिंदू 'आय लव्ह महादेव' म्हणाला, तर त्यावरही कोणाला आक्षेप नसावा." अशा वादांमुळे जगात भारताची प्रतिमा खराब होते, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
सर्वांनी कायद्याचे पालन करावे - मौलाना तौफीक अशरफी
पुण्यातील गुलशन-ए-गरीब नवाज मदरशाचे प्रमुख मौलाना तौफीक अशरफी म्हणाले, "प्रेषित मुहम्मद यांच्यावरील प्रेम हे प्रत्येक मुस्लिमाच्या श्रद्धेचा (ईमान) अविभाज्य भाग आहे. 'आय लव्ह मुहम्मद' आंदोलन हे त्याच प्रेमाची एक सुंदर अभिव्यक्ती आहे. पण, हे प्रेम व्यक्त करताना आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर केला पाहिजे."
ते पुढे म्हणाले की, "मुस्लिमांनी आपली बाजू शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने, प्रशासनाची परवानगी घेऊन मांडली पाहिजे. प्रेषित केवळ मुस्लिमांसाठीच नाही, तर 'रहमतुल-लिल-आलमीन' आहेत, म्हणजेच संपूर्ण जगासाठी रहमत (दया) आणि करुणेचे प्रतीक आहेत. आपल्या प्रत्येक कृतीत त्यांची ही शिकवण दिसली पाहिजे. प्रेषितांनी स्वतः शिकवले आहे की, 'हुब्बुल वतनी' म्हणजेच आपल्या देशावर प्रेम करणे, हा श्रद्धेचा भाग आहे. आपले देशप्रेम आपल्या वागण्यातून सिद्ध झाले पाहिजे, हीच काळाची गरज आहे."
प्रशासनाला सहयोग करावा - अब्दुल कुद्दूस हादी
जमियत-ए-उलेमा उत्तर प्रदेशचे नायब सदर आणि कानपूरचे शहर काझी, हाफिज व कारी अब्दुल कुद्दूस हादी यांनी 'आय लव्ह मोहम्मद' मोहिमेसंदर्भात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "मी सर्वांना, विशेषतः महत्त्वाच्या आणि सुज्ञ व्यक्तींना आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या भागात शांतता राखावी. मुलांना आणि तरुणांना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यापासून सक्तीने थांबवावे. पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या शहराची शांतता धोक्यात येईल."
त्यांनी आवाहन केले की, "कुणीही कायदा हातात घेऊ नये. कोणतीही समस्या उद्भवल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. 'आय लव्ह मोहम्मद' या नावावर कोणतीही एफआयआर झालेली नाही. बॅनर फाडल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे, ही अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका."
संवेदनशील परिस्थिती पाहता प्रदर्शने टाळावीत - मुफ्ती अशफाक हुसैन कादरी
ऑल इंडिया तंजीम उलेमा-ए-इस्लामचे अध्यक्ष मुफ्ती अशफाक हुसैन कादरी यांनी मुस्लिम समाजाला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. समाजाशी संवाद साधताना ते म्हणाले, "प्रेषित मोहम्मद (स.) यांच्यावर प्रेम व्यक्त करणे हे आपल्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. परंतु सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता, मी मुस्लिम तरुणांना आणि समाजातील सर्व लोकांना रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणे टाळण्याचे आवाहन करतो."
ते पुढे म्हणाले, "तुमचे विरोधक तुम्हाला रस्त्यावर आणू इच्छितात, जेणेकरून ते तुम्हालाच गुन्हेगार ठरवून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतील. हा एक सापळा असू शकतो, त्यामुळे भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका."
त्यांनी मुस्लिम समुदायाला आवाहन केले की, "प्रेषितांवरील प्रेम आणि श्रद्धा घरात आणि मस्जिदमध्ये व्यक्त करा. जर आंदोलन करणे अत्यंत आवश्यक असेल, तर कायदेशीर परवानगीशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका. उलेमा (धर्मगुरू) आणि समाजातील जबाबदार नेते एकत्र बसून पुढील रणनीती ठरवतील. त्यांच्या सामूहिक निर्णयाची प्रतीक्षा करा. प्रेषितांवरील प्रेमापोटी आपल्याकडून असे कोणतेही कृत्य होऊ नये, ज्यामुळे आपल्यावरच आरोप लावले जातील."
प्रकरण संयमाने हाताळावे - डॉ. शमसुद्दिन तांबोळी
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनीही या विषयावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले "भारतात धार्मिक भावना दुखावून सामान्य जनजीवन विस्कळीत करणार्या उन्मादी घटना सातत्याने वाढवण्याचे उद्योग चालूच आहेत. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त कानपूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लीम समाजातील काही लोकांनी 'आय लव्ह यू मोहम्मद' असे फलक घेऊन सहभागी झाले. हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग काही हिंदुत्ववादी मंडळीना भावला नाही. त्यांनी अनाठायी विरोध करून पोलीसांना कारवाई करण्यास भाग पाडले आणि पोलीसांनी गुन्हे दाखल केले. यात गुन्हे दाखल करण्यासारखे काय होते हे अनाकलनीय आहे."

मात्र याचीही प्रतिक्रिया मुस्लीम समाजात उमटली. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेशसह महाराष्ट्र आणि अनेक राज्यांत मुस्लीम समाजाने 'आय लव्ह यू मोहम्मद' मोहीम समाजमाध्यमातून चालवली गेली. ही प्रतिक्रिया स्वाभाविक असली तरी अशा मोहीमेची खरीच गरज होती का? हा प्रश्न पडतोच. आजच्या संवेदनशील आणि मुस्लीम विरोधी वातावरणात तणाव निर्माण करण्यास हे वर्तन कारणीभूत ठरू शकते आणि असे प्रकरण संयमाने हाताळायचे असतात हे मुस्लीम नेतृत्वाच्या पचनी अजूनही पडत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
शेवटी चिंता व्यक्त करत ते म्हणाले की, "धर्म आणि धर्मांधता उंबरठ्याच्या आत ठेवण्याऐवजी त्याचा सार्वजनिक अवडंबर माजवण्याचा प्रकार महागात पडणार आहे. यातून धार्मिक संवाद आणि सामाजिक सलोखा वाढण्याऐवजी पुन्हा सामाजिक तणावास खतपाणी घातले जाते. अशा प्रसंगी संयत, सावध आणि शहाणपणाची भूमिका घेणे समाज आणि देशहिताचे ठरते. शासन आणि प्रशासनाची भूमिका असे वातावरण थोपवण्याची असायला हवी मात्र तसे होताना दिसत नाही."
हा वाद लवकरात लवकर शांत करण्यासाठी आणि अनावश्यक अटकसत्र थांबवण्यासाठी मुस्लिम समाजाचे विचारवंत आणि संघटना आता कायदेशीर आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर सक्रिय प्रयत्न करत आहेत. त्यांनी दिलेल्या या संयमित प्रतिक्रिया त्याच्याच द्योतक आहेत.