भुकेलेल्यांना मोफत अन्न देणारी पुण्यातील रोटी बँक

Story by  test | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
गरजूंना राशन वाटप करताना 'अर्क' चे पदाधिकारी आणि इतर सहकारी.
गरजूंना राशन वाटप करताना 'अर्क' चे पदाधिकारी आणि इतर सहकारी.

 

रमजानचा महिना सुरु आहे. रमजानचा महिना खिदमतचा आणि इबादतचा म्हणजे सेवेचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात मुस्लीम बांधव विशेष नमाज अदा करतात, उपवास ठेवतात ज्याला रोजा असे म्हणतात. याच सोबत इतरांची सेवा करण्यातही अग्रेसर भूमिका बजावतात. असाच एक उपक्रम पुण्याच्या कोंढव्यातील काही शेजारी राबवतात ज्यांची सर्वत्र चर्चा आहे.      

‘जास्तीत जास्त गरजूंना मदत करा’, ‘भुकेलेल्यांना अन्न द्या’, ‘रुग्णांची सेवा करा,’ या प्रकारची प्रेषित मोहम्मदांची वचन प्रसिध्द आहेत. इस्लाममध्ये भुकेलेल्यांना अन्न देण्यात पुण्य असल्याचे सांगितले आहे. इतकंच नव्हे तर ‘तुमचे शेजारी जर भुकेले झोपत असतील तर तुम्ही खरे मुसलमान नाही’, असेही इस्लाम सांगतो. इस्लामच्या याचं शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांनी मिळून ऑगस्ट २०१९ मध्ये एका संस्थेची स्थापना केली. 'अर्क चॅरिटेबल ट्रस्ट' असे या संस्थेचे नाव. दोनवेळच्या अन्नासाठी भटकण्याची वेळ ज्यांच्यावर आली आहे अशा विधवांचे आणि निराधार महिलांचे पोट भरण्याचे काम मागील चार वर्षांपासून 'अर्क'च्या 'रोटी बँक' या उपक्रमातून ते करत आहेत. 

केवळ पोटाची भूक भागवून या लोकांचा कायमचा प्रश्न सुटणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी रस्त्यावर जगणाऱ्या-वाढणाऱ्या त्यांच्या मुलांना व अशा प्रकारे जगणाऱ्या इतर मुलांनाही शिक्षणाबद्दल जागरूक करायला सुरुवात केली. या मुलांना त्यांनी परिसरातल्या विविध शाळांमध्ये दाखल केले; शिवाय, कितीतरी विधवा महिलांना त्यांनी आज रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही कथा आहे सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी शिक्षण, रोजगार आणि उपासमार या विषयांवर काम करणाऱ्या पुण्यातल्या आलिया शेख आणि नसिर शेख या शेजाऱ्यांची. 
 
    
 
आलिया यांनी पुण्याच्या लष्कर परिसरातल्या 'आबेदा इनामदार महाविद्यालया'तून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. आलिया यांच्या बोलण्यात त्यांचा विकसित शैक्षणिक दृष्टिकोन दिसून येतो. त्या सांगतात, "माझी शिकण्याची इच्छा होती; पण लवकर लग्न झाल्यामुळे मला पुढे शिक्षण घेता आले नाही. मात्र, मी शिकले नाही म्हणून काय झाले? माझ्या सभोवतालच्या मुलींना तर मी शिक्षित करू शकते. माझी मुले आज चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबू नये, यासाठी मी प्रयत्न करत असते."
    
नसिर यांनीही लष्कर परिसरातल्याच 'मोलेदिना हायस्कूल'मधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी अकरावीला प्रवेश घेतला. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी 'रायटिंग पेंटर' म्हणून काम सुरू केले. आर्थिक परिस्थितीवर मात करत पुढे गेलेले नसिर म्हणतात, "आर्थिक हलाखीच्या परिस्थितीमुळे कोणी भुकेले राहू नये. अन्न हे पोटाची भूक भागवते, तर शिक्षण हे मेंदूची-मनाची भूक भागवायचे काम करत असते. असे असल्यामुळेच या दोन्ही गोष्टी मूलभूत गरजांमध्ये गणल्या जातात," असे संवेदनशील मनाचे नसिर सांगतात. 

नसिर आणि आलिया यांचे काम बघून आयेशा शेख ह्याही त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाल्या. आयेशा यांचे शिक्षण नाशिकमध्ये झाले. 'ग्लास्को' ह्या मल्टिनॅशनल कंपनीत त्या जॉइंट सेक्रेटरी आणि युनियन लीडर होत्या. चौसष्टवर्षीय आयेशा सेवानिवृत्त आहेत, तर तीसवर्षीय आलिया ब्यूटिशियन आणि चौरेचाळीस वर्षीय नसिर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आपापले व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत हे तिघेही 'अर्क'च्या माध्यमातून काम करत असतात. 

अनेक लग्नसमारंभांत अन्न मोठ्या प्रमाणावर उरते. हे अन्न, हे जेवण वाया जाऊ नये म्हणून या तिघांनी पुण्यातल्या मंगल कार्यालयांमध्ये काही पाट्या लावल्या आहेत. 'जेवण उरल्यास संपर्क करावा... आम्ही ते भुकेल्या पोटांपर्यंत पोहोचवू', अशा आशयाच्या या पाट्या आहेत. त्यामुळे अशा विविध मंगल कार्यालयांतूनही 'अर्क'ला जेवणाची मदत होते. 

 
या तिघांनी या कामाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. सुरुवातीला त्यांच्याकडे निधी वगैरे नव्हता. त्यामुळे सुरुवातीचे आठ दिवस आलिया स्वत: घरून स्वयंपाक करून नेत होत्या. त्यानंतरचे आठ दिवस नसिर जेवण तयार करून आणायचे आणि त्यानंतर पुढे आयेशा ह्याही जेवण तयार करून आणू लागल्या. त्यामुळे तिघांपैकी कोणाही एकावर कामाचा भार पडला नाही. आलिया सांगतात, "गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचत राहिलो. जसजसे काम वाढत गेले तसतसे इतर लोकही मदतीसाठी पुढे येऊ लागले. काहींनी आम्हाला आर्थिक मदत करायला सुरुवात केली, तर काही जण तेल, धान्य किंवा इतर साहित्य पुरवू लागले. चांगले काम करत गेल्यामुळे मदतीचे हात आपोआप पुढे येत गेले व आमच्या उपक्रमाशी ते लोक जोडले गेले."     

सभोवतालच्या लोकांची हलाखीची परिस्थिती नसिर बघत होते. या परिस्थितीतून ते स्वतः गेल्यामुळे याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे, 'रोटी बँक' हा उपक्रम सुरू करायचा, असे त्यांनी ठरवले आणि या उपक्रमात आलिया आणि आयेशा त्यांना जोडल्या गेल्या. नसिर सांगतात, "'रोटी बँक'चे काम हे एका दिवसाचे काम नाही. महिन्यात एक कार्यक्रम घेतला आणि आता पुढचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात घेतला तरी चालेल, असे इथे नाही. इथे कामात सातत्य लागते. लोकांच्या पोटाची भूक भागवून त्यांच्या मुलांना शाळेत शिकायला पाठवणे हे आव्हानात्मक असते. मात्र, आपल्यामुळे कोणाचे तरी आयुष्य बदलत आहे हे बघणेही आनंददायी आहे."    

आयेशा सांगतात, "लाकूडफाटा, कोळसे अशा पारंपरिक जळणाअभावी, तसेच ते परवडत नसल्यामुळे केवळ कागद हेच जळण वापरून स्वयंपाक करताना आम्ही लोकांना पाहिले आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांना तडफडताना पाहिले आहे." 'अर्क'च्या माध्यमातून दररोज पन्नास कुटुंबांना जेवण दिले जाते. मुलांची शैक्षणिक फी भरली जाते. 

कोंढवा, भाग्योदयनगर या परिसरातल्या लोकांपर्यंत ते थेट जेवण पोहोचवतात. मात्र हडपसर, कात्रज या परिसरातले गरजू लोक रोजच्या रोज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा आलिया, आयशा आणि नसिर यांनाही रोज तिथपर्यंत डबे नेणे शक्य होत नाही. त्यामुळे पडताळणी करून, दिलेल्या ओळखपत्रावरून त्या त्या भागात जाऊन किमान दोन महिने पुरेल इतके किराणावाटप हे तिघ करतात. रमजानमध्ये 'सहरी'ची आणि 'इफ्तारी'ची सोयही करतात.समाधानी आयेशा पुढे सांगतात, "गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना मदत करता येते याचा आनंद आहे. आलिया आणि नसिर यांच्या कामामुळे एका चांगल्या संस्थेशी मी जोडली गेले आहे." 

खरे तर हे काम फक्त आलिया, आयेशा आणि नसिरचे नाही. कोणतेही काम सुरु करत असताना कुटुंबियांची भूमिका आपल्याकडे फार महत्वाची मानली जाते. या तिघांच्या सामाजिक वाटचालीत त्यांच्या कुटुंबियांचेही महत्वाचे योगदान आहे. कारण ‘ये तो सवाब का काम है’ असे म्हणत या तिघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या समाजकार्याला कर्तव्य म्हणून स्वीकारले आहे. 

‘अर्क’च्या पुढील सामाजिक प्रवासास ‘आवाज मराठी’च्या खूप खूप शुभेच्छा!

(‘अर्क’ ला मदत करण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा.)  

- छाया काविरे ([email protected])
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter