उत्तर प्रदेश : मुस्लीम मतांचा फायदा कोणाला होणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 11 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

लखनौ

लोकसभेसाठी दोन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम मतांचा प्रभाव किती पडणार, या मुद्द्याची चर्चा अधिक गांभीर्याने होत आहे. विशेषत: रामपूर, मुरादाबाद, संभल याशिवाय पश्‍चिम उत्तर प्रदेशमधील इतर मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष असेल. मुस्लीम मतांचे पुन्हा एकदा विभाजन करून भाजप एकहाती सत्ता मिळविणार का, याबाबत उत्सुकता आहे.

दिल्लीत सरकार स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ८० मतदारसंघ मिळून १५.३४ कोटी पात्र मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने ६२ तर, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकून सप-बसप-काँग्रेसला धूळ चारली होती. त्यातल्या त्यात बसपला १० जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाला पाच आणि काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

मुस्लीम मतांची अधिक टक्केवारी असलेल्या राज्याच्या पश्‍चिम भागात त्यांना चांगले यश मिळाले होते. यंदा मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. मागीलवेळी आघाडी करून लढलेल्या ‘बसप’ने यंदा स्वबळाची परीक्षा पाहण्याचा निर्णय घेतला आहे, तर पश्‍चिम भागात प्रभाव असलेल्या राष्ट्रीय लोक दलाने भाजपला साथ दिली आहे. सप आणि काँग्रेस मात्र एकत्रितपणे लढत आहेत.
Article Hero Image
 
पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या आठ मतदारसंघांमध्ये सरासरी ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील अमरोहा, मीरत, मथुरा, बागपत, अलिगढ, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर आणि बुलंदशहर या आठ मतदारसंघांमध्येही मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे. २०१९ च्या निवडणुकीत या १६ मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी ‘बसप’ने विजय मिळविला होता, तर तीन ठिकाणी ‘सप’ला यश मिळाले होते. मुझफ्फरनगर, कैराना, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि अलिगढ या ठिकाणी भाजपला मतविभाजनाचा फायदा झाला होता. यंदा या ठिकाणी मुस्लीमांचे एकगठ्ठा मतदान झाले तरच सप व काँग्रेसला यश मिळेल, अशी परिस्थिती आहे.

सप-काँग्रेसला चिंता
मागील तीन ते चार वर्षांपासून मुस्लीमांच्या प्रश्‍नांवर समाजवादी पक्षाने आवाज उठवलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर हे मतदार नाराज आहेत. स्वतंत्रपणे लढणाऱ्या ‘बसप’ने अनेक ठिकाणी मुस्लीम उमेदवाराला उभे केले आहे. त्यामुळे मतविभाजन होण्याचा धोका आहे. त्यातच जाट मते भाजपच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता असल्याने मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. समाजवादी पक्षाला मात्र हा तर्क मान्य नसून मुस्लीम समाज आपल्याच बाजूने ठामपणे उभा आहे, अशी या पक्षाच्या नेत्यांची खात्री आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 

Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter