लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 'इतके' टक्के झाले मतदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 11 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन मतदारसंघांसह देशातील एकूण ८८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. मागील वेळेसच्या निवडणुकीच्या तुलनेत विदर्भात मतदानात घट झाली असली, तरी मराठवाड्यात मात्र जवळपास तेवढेच मतदान झाले आहे. मराठवाड्यासह इतर राज्यांतील काही मतदारसंघांमध्ये नियोजित वेळेनंतरही मतदान सुरू होते.

प्राथमिक आकडेवारीनुसार मतदान कमी झाल्याचे दिसत असले, तरी अंतिम आकडेवारीनंतर मतदान वाढल्याचे दिसून येईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, देशभरात ६०.९६ टक्के, तर राज्यात ५९.६३ टक्के मतदान झाले. देशात १३ राज्यांत सरासरी ६१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्रिपुरात सर्वाधिक ७९.६३ टक्के मतदान झाले.

राज्यात विदर्भातील बुलडाणा, अकोला, यवतमाळ-वाशिम, अमरावती आणि वर्धा या पाच जागांसाठी, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जागांसाठी मतदान झाले. राज्यात नवनीत राणा, रविकांत तुपकर, प्रकाश आंबेडकर, प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडकर, रामदास तडस यांच्यासारख्या दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंद झाले. देशात सर्वाधिक मतदान त्रिपुरा येथे झाले, तर सर्वांत कमी मतदान उत्तर प्रदेशात (५४.८५ टक्के) झाले.

राज्यातील आज मतदान झालेल्या आठही मतदारसंघांमध्ये ४० अंश सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमान होते. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानासाठी येणाऱ्यांची संख्या कमी होती. मराठवाड्यासह अनेक मतदारसंघांमध्ये वेळेनंतरही मतदान घेण्यात आले. काही केंद्रांवर तर रात्री नऊ नंतरही मतदान सुरू होते.

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडले. वर्धा लोकसभा मतदारसंघात हिंगणघाट, देवळी विधानसभेत ‘ईव्हीएम’ बंद पडल्याने मतदानास विलंब झाला तर मतदानाचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पुलगाव पोलिस स्टेशनमध्ये आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मतदारयाद्यांतील घोळामुळे हिंगणगाट विधानसभेतील २० नागरिक मतदानापासून वंचित राहिले.

देशभरात मतदानाचे प्रमाण
आसाम (७२.६३), बिहार (५५.७७), छत्तीसगड (७३.९४), जम्मू-काश्‍मीर (७२.३२), कर्नाटक (६८.३७), केरळ (६६.४८), मध्य प्रदेश (५८.०६), महाराष्ट्र (५९.३८), मणिपूर (७७.६२), राजस्थान (६४.०७), त्रिपुरा (७९.६३), उत्तर प्रदेश (५४.८५) आणि पश्‍चिम बंगाल (७१.८४)