भारतीय मुस्लीमांविषयी काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नुकतीच उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची बैठक पार पडली. या तीन दिवसीय बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांसंबंधी महत्त्वाचे वक्तव्य केले. देशातील मुस्लीमदेखील आमचेच आहेत, ते आमच्यापेक्षा वेगळे नाहीत.  त्यांची पूजापद्धती केवळ बदलली आहे. हा देश त्यांचादेखील आहे. ते भारतातच राहणार आहेत, असे  भागवत यांनी  म्हटले आहे. 

संघ संपूर्ण समाजाला एकत्रित करू इच्छितो. संघासाठी कुणीच परके नाहीत.आमचा विरोध करणारेही आमचेच आहेत. मात्र त्यांच्या विरोधामुळे आमच्या संघटनेची हानी होऊ नये इतकी काळजी आम्ही नक्की घेऊ असेही भागवत यांनी नमूद केले.

लखनऊच्या सरस्वती शिशू मंदिरात त्यांनी विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, 'हिंदू धर्मावर टीकाटिप्पणी करणारे लोक या धर्माला जाणतच नाहीत. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात लोकांनी हिंदू धर्म जाणल्यावर ते देखील याचे प्रशंसक झाले आहेत.' सनातन ही संस्कृती असल्याचेही भागवत यांनी म्हटले.

या संवादाकरता मुस्लीम समुदायातून डॉक्टर मोहम्मद शादाब आणि कलीमुल्ला या दोन प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. भारत आणि शेजारी राष्ट्रांशी संबंधांविषयी ते म्हणाले, 'संघ सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तानचा विरोध करणाऱ्या देशांसोबत भारताने अधिक चांगले संबंध  निर्माण करायला हवेत.' देशाच्या विदेश धोरणावर आम्ही कोणताही सल्ला देत नाही. परंतु भारताने बांगलादेशशी सहकार्य वाढविले आहे, त्याचप्रकारे इतर पाकिस्तानविरोधी देशांसोबत सहकार्य वाढवावे, असेही भागवत यांनी यावेळी सुचवले.