"आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक," शरद पवारांनी सांगितला मार्ग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

 

मुंबईत मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा जोर धरत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक असल्याचे मत मांडले आहे. आरक्षणावर असलेली मर्यादा लक्षात घेता, घटनादुरुस्ती हाच यावरचा उपाय असल्याचे ते म्हणाले.

अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथे एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, "जवळपास ८० टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे, पण केवळ शेती त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकत नाही. त्यामुळे आरक्षण हाच त्यांच्यासाठी एकमेव पर्याय उरतो."

यासाठी घटनादुरुस्तीच्या गरजेबद्दल आपण इतर खासदारांशी चर्चा करत असल्याचेही पवार यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर ५२ टक्क्यांची मर्यादा घातली असली तरी, तामिळनाडूतील ७२ टक्के आरक्षणाला न्यायालयानेच मान्यता दिली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

"या मुद्द्यावर केंद्राची भूमिका पारदर्शक आणि स्पष्ट असायला हवी," असे म्हणत, समाजात कटुता निर्माण होऊ नये यासाठी देशाला एका समान धोरणाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारपासून मुंबईत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.