गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाड्यात अनेक नद्यांना पूर आल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, याच संकटाने माणुसकीला एकत्र आणले आणि जात-धर्माच्या भिंती ओलांडून एकमेकांना मदत करण्याचे अनेक प्रसंग समोर आले. असाच एक प्रसंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात घडला, जिथे काही मुस्लिम तरुणांनी दाखवलेल्या धाडसाने सर्वांची मने जिंकली.
कन्नड शहरातील शिवनगर भागातून वाहणाऱ्या शिवना नदीच्या दुसऱ्या कठावरील एका शेतात लंगोटी महादेव मंदिर आहे. या मंदिरात पुजारी दिलीप गिरी हे त्यांच्या दोन भावंडांच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर आला आणि मंदिर परिसराला पाण्याचा वेढा पडला. यात पुजारी दिलीप गिरी यांच्यासह एकूण सहा जण अडकून पडले. या कुटुंबांनी जीव मुठीत धरून रात्र काढली. सकाळी मदतीसाठी त्यांनी आरडाओरड सुरू केली.
पुजाऱ्याचा आवाज ऐकताच, फैजल हसन पठाण, सलमान पठाण, अझर पठाण, फैयाज पठाण, सोनू लाल पठाण, अय्याज हसन पठाण आणि अनिस सलीम पठाण या मुस्लिम तरुणांनी, विलास जाधव या आपल्या मित्रासह, क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी धाव घेतली.
जात-धर्माची भिंत बाजूला सारत, पाण्याच्या जोरदार लाटांचा सामना करत हे तरुण मंदिराजवळ पोहोचले. त्यांनी चक्क कमरेएवढ्या पाण्यातून पुजारी गिरी यांना आपल्या पाठीवर उचलून घेतले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एकामागून एक सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
या मुस्लिम तरुणांच्या धाडसामुळे आणि मानवतेच्या भावनेमुळे पुजारी आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित बाहेर आले. या एका घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे एक ज्वलंत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. या तरुणांच्या धैर्याचे आणि निस्वार्थ सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.