श्रीमंत देशांतील मनुष्यबळ गुलामगिरीत : वॉक फ्री फाउंडेशनचा अहवाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

लंडन : जगातील वीसपेक्षाही अधिक श्रीमंत देश हे मनुष्यबळाचे मोठ्याप्रमाणावर शोषण करत असून अंदाजे पन्नास दशलक्ष लोकांच्या नशिबी आधुनिक गुलामगिरीचे जिणे आले आहे अशी धक्कादायक माहिती ‘वॉक फ्री फाउंडेशन’ने तयार केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालात आधुनिक गुलामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

 

वीस देशांच्या समूहातील सहा सदस्य देशांमधील परिस्थिती बिकट झाली असून मोठ्या संख्येने लोकांकडून एक तर बळजबरीने काम करून घेतले जात आहे किंवा त्यांना जबरदस्तीने विवाह बंधनात अडकविले जात आहे.

 

ऑस्ट्रेलियातील ‘वॉक फ्री’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालामध्ये १६० देशांतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासाठी हजारो लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. अनेक देशांत ही स्थिती बिकट होण्यामागे अंतर्गत संघर्ष, पर्यावरणाची हानी, मार्गांनी लोकशाहीवर होणारे हल्ले, महिलांच्या अधिकारांचा संकोच व कोरोनाच्या महासाथीनंतर झालेल्या आर्थिक-सामाजिक समस्यांचा समावेश आहे.

 

या विविध पातळ्यांवरील अस्थिरतेचा मोठा परिणाम शिक्षण आणि रोजगारांवर झाल्याचे दिसून येते यामुळे गरिबी तर वाढलीच पण त्याचबरोबर बळजबरीने होणारे असुरक्षित स्थलांतर देखील वाढले आहे. या सर्वांचा परिणाम होऊन आधुनिक गुलामगिरीमध्ये वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. २०२१ च्या अखेरपर्यंत सर्वाधिक गुलामगिरी असणाऱ्या देशांमध्ये उत्तर कोरिया, एरिट्रीया, मॉरिटानिया, सौदी अरेबिया आणि तुर्कस्थान यांचा समावेश होता.


या देशांत प्रमाण तुलनेने कमी

ज्या देशांत आधुनिक गुलामगिरी सर्वांत कमी आहे त्या देशांच्या क्रमवारीमध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, जर्मनी, नेदरलँड, स्वीडन, डेन्मार्क, बेल्जियम, आयर्लंड, जपान आणि फिनलंड या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या देशांमध्ये आर्थिक संपन्नता, लिंग समानता, सामाजिक कल्याणाच्या विविध योजना व राजकीय स्थैर्य असूनहीयेथे मनुष्यबळाचे शोषण होत असल्याचे दिसून आले आहे.

 

मागील वर्षीची स्थिती

मागील वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन अँड वॉक फ्री या संघटनांनी तयार केलेल्या अहवालामध्ये ५० दशलक्ष लोक हे आधुनिक गुलामगिरीत जगत असल्याचे निष्पन्न झाले होते. २८ दशलक्ष लोकांना बळजबरीने काम करावे लागत असून २२ दशलक्ष लोकांना बळजबरीने विवाहबंधनात अडकावे लागत असल्याचे दिसून आले होते.

 

फास्ट फॅशन, सीफूडमुळे स्थिती बिकट

फास्ट फॅशन आणि सीफूडमुळे या उद्योगांतील मनुष्यबळाचे शोषण अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. कोकोच्या शेतीमध्ये बालमजुरीचे प्रमाण धक्कादायक असल्याचे दिसून आले. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, पोर्तुगाल आणि अमेरिका या देशांनी गुलामगिरीला पायबंद घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्याचे दिसून आले पण अन्य देश याबाबत पुरेसे गंभीर नाहीत.