आयपीएल (IPL) स्पर्धेदरम्यान खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि संघ अधिकाऱ्यांच्या हॉटेल रूममध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बंदी घातली आहे. 'अँटी करप्शन युनिट'ने काही बेशिस्तीच्या आणि नियमांच्या उल्लंघनाच्या घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर बीसीसीआयने संभाव्य 'हनी ट्रॅप', कायदेशीर गुंतागुंत आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा कठोर निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दहा आयपीएल फ्रँचायझींच्या सीईओ आणि अधिकाऱ्यांना एक सविस्तर मार्गदर्शक सूचना (Advisory) पाठवली आहे. यानुसार, टीम मॅनेजरच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पाहुण्याला खेळाडू किंवा अधिकाऱ्यांच्या रूममध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने टीम मॅनेजरला न सांगता बाहेरील व्यक्तींना हॉटेल रूममध्ये प्रवेश दिल्याचे बीसीसीआयच्या निदर्शनास आले होते.
उच्चभ्रू क्रीडा स्पर्धांमध्ये 'हनी ट्रॅप' आणि ब्लॅकमेलिंगचे धोके नेहमीच असतात, असे सांगत बीसीसीआयने फ्रँचायझींना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षा अधिकारी आणि 'टीम इंटिग्रिटी ऑफिसर'ला पूर्वकल्पना दिल्याशिवाय अनियमित वेळेत हॉटेलबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.
बीसीसीआयने काही संघ मालकांच्या वर्तनावरही आक्षेप घेतला आहे. सामन्यादरम्यान काही मालक खेळाडूंशी बोलण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा किंवा शारीरिक संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे. हा हेतू चांगला असला तरी यामुळे संघाच्या नियोजनात आणि सामन्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामन्यादरम्यान मालकांना डगआउट, ड्रेसिंग रूम किंवा मैदानात खेळाडूंशी थेट संपर्क साधण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नुकतेच एका सामन्यादरम्यान एका खेळाडूने ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत ई-सिगारेट (Vape) ओढल्याचा प्रकार समोर आला होता. भारतीय कायद्यानुसार ई-सिगारेट ओढणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धास्थळी, ड्रेसिंग रूम, डगआउट, टीम हॉटेल आणि सराव मैदानावर ई-सिगारेट तसेच कोणत्याही प्रतिबंधित पदार्थांच्या वापरावर बीसीसीआयने कडक बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडापासून ते खेळाडूच्या निलंबनापर्यंतची कारवाई होऊ शकते, असा इशारा बीसीसीआयने दिला आहे.