वयाच्या 36 व्या वर्षीही वर्ल्ड रँकिंगमध्ये जोकोविचेच वर्चस्व!

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 29 d ago
सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच
सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच

 

सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच आजकाल जेव्हाही मैदानात उतरतो, तेव्हा काही ना काही विक्रम करत असतो. तो आता येत्या आठवड्यातच मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे.

तो रविवारी (7 एप्रिल) रोजी जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये अव्वल क्रमांक मिळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. तो त्यावेळी 36 वर्षे आणि 321 दिवसाचा असेल.

जोकोविच पहिल्या क्रमांकावर 419 आठवडे देखील पूर्ण करेल. तो सर्वाधिक आठवडे क्रमांक एकवर राहाणारा टेनिसपटूही आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रॉजर फेडररपेक्षा तो 109 आठवडे अधिक काळ पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. फेडरर 310 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. तसेच स्टेफी ग्राफ 377 आठवडे अव्वल क्रमांकावर होती.

दरम्यान, जोकोविच 22 मे 2017 रोजी 30 वर्षांचा झाला. त्यानंतरही त्याने 31 एटीपी टूर विजेतीपदं मिळवली, यात 12 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा समावेश आहे. तसेच 10 एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांमधील वजेतेपदांचा समावेश आहे.

जोकोविचने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत आत्तापर्यंत 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत, तसेच 40 एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांचे विजेतेपद जिंकले आहेत.

जोकोविच सर्वात आधी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर 4 जुलै 2011 रोजी आला होता. त्यावेळी तो 24 वर्षांचा होता. दरम्यान, त्याचे प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी वयाच्या 22 व्या वर्षी अव्वल क्रमांक मिळवला होता.

जोकोविचने त्याच्या कारकिर्दीत गेल्या 13 वर्षात मोठे यश मिळवले असून तो सध्या सर्वात यशस्वी टेनिसपटूही आहे.