पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित दुसऱ्या पुणे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक गटात फैयाज शेखने विजेतेपदाचा मान मिळविला. कॅरम संघटना ऑफ पुणेच्या मान्यतेने चिंचवड येथील मनीषा भोईर विरंगुळा केंद्र प्रेमलोक पार्क येथे सुरू संपलेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत फैय्याज शेखने रंगतदार सामन्यात प्रीतम कटकेवर १८-१९, १८-१७, २४-१८ असा विजय मिळविला. होता या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळ केला. प्रीतम कटकेने पहिली गेम १९-१८ अशी निसटती जिंकत आघाडी मिळवली परंतु त्यानंतर फैय्याज शेखने पुढील दोनही गेम १८-१७, २४-१८ अशा फरकाने जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी उपांत्य फेरीत प्रीतम कटकेने रईस शेखवर २५-५, २५-४ असा तर फैयाज शेखने रवी श्रीगादीवर २१-४, २५-१ असा विजय मिळविला होता तर उपांत्यपूर्व फेरीत प्रीतम कटकेने संजय थिटेचा २५-१०, ११-२५, २५-५ असा, रईस शेखने सैफ काझीचा १६-१७, २५-१, २५-१२ असा, रवी श्रीगादीने रझ्झाक शेखचा २४-७, २२-१२ असा तर फैयाज शेख ने फैयाज मणियारला २५-१८, २५-१ असे हरविले होते.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अप्पा बागल, सुरेश भोईर, कॅरम संघटना ऑफ पुणेचे सचिव सुशील गुजर, प्रमुख पंच संदीप अडागळे. गौरव गर्दै, प्रतीक सोमकुवर, अनिल मुंढे, इम्तियाज हण्णूरे, वसीम शेख, भाई साने, शीतल मारणे, अरुण कडुस, विनोद देसाई, मुकेश इंगुळकर, मंदार कुलकर्णी, विष्णू भूते हे उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश कदम यांनी केले.