ओनिका माहेश्वरी
२६ ऑगस्टला मुसळधार पावसात वैष्णो देवी मार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे २२ दिवस बंद राहिलेली या पवित्र तीर्थस्थळाची यात्रा १७ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. वैष्णो देवीची तीर्थयात्रा विविध समुदायांना एकत्र आणते आणि काहींसाठी उपजीविकेचे साधन आहे. कटरा हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे आणि हे पवित्र शहर देशभरात बंधुभावाचा मजबूत संदेश देत आहे.
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात ९९ टक्के स्थलांतरित मुस्लिम राहतात. त्यांनी सुमारे ७०० वर्षांपासून तीर्थयात्री माता वैष्णोच्या भवनापर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पाऊस आणि भूस्खलनादरम्यान विविध धर्मांमधील एकजुटीचे आणि करुणेचे अनेक दाखले समोर आले आहेत. कठुआ जिल्ह्यात एका हिंदू कुटुंबाने पूरात घरे उद्ध्वस्त झालेल्या मुस्लिम शेजाऱ्यांना आश्रय दिला होता. मुस्लिम नेत्यांनी वैष्णो देवी मंदिरातील भूस्खलनातील मृत्यूंवर शोक व्यक्त केला आणि प्रभावित कुटुंबांना मदत केली आहे. या घटना २०१४ च्या पूरप्रसंगातील सामुदायिक एकतेची आठवण करून देतात. स्थानिक आमदाराने याला जम्मू-काश्मीरच्या खऱ्या मानवतेची मिसाल म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यातील कटऱ्यात माता वैष्णो देवी मंदिर आहे. हे भारतातील प्रमुख तीर्थस्थळ आहे. ५,२०० फूट उंचीवर कटऱ्यापासून सुमारे १२ किलोमीटर (७.४५ मैल) अंतरावर हे मंदिर आहे. कटऱ्यात माता वैष्णोदेवीचे भक्त डोंगरात दर्शनासाठी फक्त घोडे, बग्गी, पालकीने जाऊ शकतात. हे सर्व बहुतांशी मुस्लिम चालवतात. हे सर्व गुर्जर मुस्लिम आहेत. घामाघूम होऊनही हे मुस्लिम घोडे, बग्गी, पालकीवाहक हिंदू तीर्थयात्री पालकीत बसवून खांद्यावर उचलतात. हाच त्यांच्या उपजीविकेचा मार्ग आहे. यातून त्यांच्या घरात चूल पेटते.
हिंदू तीर्थयात्री मुस्लिम पालकीवाहकांच्या खांद्यावर वैष्णो देवीपर्यंत पोहोचतात. मुस्लिम घोडे, बग्गी, पालकीवाहक ‘जय माता दी’ म्हणत स्वागत करतात आणि १२ किलोमीटरच्या खड्या चढणीवर फक्त तीन-चार वेळा श्वास घेण्यासाठी थांबतात. मुस्लिम घोडे, बग्गी, पालकीवाहक श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र देखील आहे.
मी तिथे भक्तांना डोंगरापर्यंत नेणाऱ्या टट्टू मालक आणि पालकीवाहकांशी बोलले. मुस्लिम लोक यात्रेदरम्यान ‘जय माता दी’ म्हणतात आणि कामादरम्यान वेळ मिळाला तर नमाजही अदा करतात. मी त्यांची छायाचित्रे घेतली. त्यामध्ये बहुतांशी तरुण काश्मिरी पुरुष होते.
येथे मी भक्तांना माता वैष्णोच्या यात्रेला नेणाऱ्या घोडे चालक अब्दुल लतीफ यांच्याशी बोलले. रियासीचे रहिवासी लतीफ यांनी सांगितले की, इथे कोणताही भेद नाही, सारे एकत्र ‘जय माता दी’चा जयघोष करतात. लतीफ गेल्या दहा वर्षांपासून कटऱ्यात एकतेचा आदर्श आहेत.

माता वैष्णोच्या यात्रेदरम्यान लतीफ वेळ काढून नमाज अदा करतात. अब्दुल लतीफ भक्तांना सवारी देऊनच रोजीरोटी कमावतात. त्यांचे कुटुंब रियासीत राहते. ग्राहक जास्त असल्यास ते महिन्याला ४० ते ५० हजार रुपये कमावतात. पण अब्दुल लतीफ कटऱ्यात भाड्याने राहतात.
हे सर्व श्राइन बोर्डाच्या देखरेखीखाली चालते. ते टट्टू, पिट्ठू आणि पालखीसाठी जिल्हा प्रशासन, रियासीने निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्क आकारतात. यांचा अंदाजे आकडा २,५०० आहे. यात ६० टक्के मुस्लिम आहेत आणि सारे इथे घोडे, पालकी, पिट्ठू चालवतात. हे रियासी जिल्ह्यातून येऊन कटऱ्यात भाड्याने राहतात आणि त्यांचे कुटुंब रियासीत आहे. रियासी जिल्ह्यात ६० टक्के मुस्लिम आणि ४० टक्के हिंदू एकत्र राहतात.
कटरा बाजारातही मुस्लिमांचा व्यापारात सहभाग आहे. कटरा बाजारात हजारो स्थानिक मुस्लिम आणि हिंदू एकत्र काम करतात आणि देशभरात सांप्रदायिक सलोखा आणि बंधुभावाचा अनोखा संदेश देतात. ही एकता कटऱ्याला हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे प्रतीक बनवते. इथे व्यापारात बहुतांशी मेवा आणि शालींचा व्यवसाय करणारे काश्मिरी आहेत. येथे वाहतुकीचा व्यवसाय मुस्लिम करतात. ते घोडे, खेचरे आणि पाठीवर सामान लादून चढाईपर्यंत पोहोचवतात.
यंदा नवरात्रीसाठी माता वैष्णो देवी मंदिर फुलांनी सजवले गेले आहे. माता वैष्णो देवीच्या दरबाराला सजवण्यासाठी सुमारे १० देशांतून झेंडू, चमेली, गुलदा यासारखी अनेक प्रकारची फुले आणली गेली आहेत. मार्गावर भव्य प्रवेशद्वारे उभारली गेली आहेत. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात त्रिकुटा डोंगरांवर माता वैष्णो देवीचे मंदिर आहे. शारदीय नवरात्रीच्या पूर्वसंध्येला रविवारी मंदिराला फुलांनी सजवण्यात आले आहे. यामुळे पुढील नऊ दिवसांत येणाऱ्या हजारो भक्तांसाठी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने तीर्थयात्रींचे मार्गदर्शन, प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन आणि १२ किलोमीटरच्या यात्रा मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वयंसेवक तैनात केले आहेत. २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत चालणारी नवरात्री देवी दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित आहे. माता वैष्णो देवी मंदिरात याला विशेष महत्त्व आहे. या काळात सर्वाधिक तीर्थयात्री येतात. भक्त भजने गातात, प्रार्थना करतात आणि समृद्धी व कल्याणाचा आशीर्वाद मागत चढाई करतात. सुरक्षेसह सर्व व्यवस्था पूर्ण केल्या गेल्या आहेत. भक्तांना चांगला अनुभव देण्यासाठी भवनासह संपूर्ण मार्गाला अतिरिक्त पायऱ्यांनी सजवले आहे.
उत्तर भारतात माता वैष्णो देवी हे सर्वात प्रसिद्ध सिद्धपीठ आहे. हे उत्तर भारतातील सर्वात पूजनीय पवित्र स्थळांपैकी एक आहे. माता वैष्णो देवीची महिमा अपार आहे. मातेच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परतत नाही, असे मानले जाते. या धार्मिक स्थळाची आराध्य देवी वैष्णो देवी यांना माता राणी, वैष्णवी, दुर्गा आणि शेरावाली माता अशा अनेक नावांनी ओळखले जाते.
इथे आदिशक्ती स्वरूपातील महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती पिंडी रूपात त्रेतायुगापासून एका गुहेत विराजमान आहेत. माता वैष्णो देवी स्वतः येथे शाश्वत निराकार रूपात आहे. वेद-पुराणांनुसार हे मंदिर १०८ शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे लोक १४ किलोमीटरची चढाई करून भवनापर्यंत पोहोचतात. दरवर्षी लाखो तीर्थयात्री या मंदिराच्या दर्शनाला येतात. मंदिर ५,२०० फूट उंचीवर कटऱ्यापासून सुमारे १२ किलोमीटर (७.४५ मैल) अंतरावर आहे.
जंबू हे जम्मूचा प्राचीन नाव आहे. अशी मान्यता आहे की पवित्र गुहेत देवीचे मूळ उपासक पांडव होते. जवळच्या पर्वतरांगेत पांडवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच दगडी आकृती सापडल्या आहेत. यामुळे वैष्णो देवी मंदिराचे पांडवांशी असलेले नाते काही अंशी विश्वासार्ह ठरते.