वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची झेप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज

 

भारतीय क्रिकेट संघाने अखेरच्या दिवशी यजमान इंग्लंडवर विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशा बरोबरीत राखली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सर्वाधिक २३ फलंदाज बाद करीत मालिका गाजवली. या मालिकेतील घवघवीत यशानंतर मोहम्मद सिराजने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत १२ स्थानांनी प्रगती केली आहे. आता तो १५व्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा गोलंदाजी क्रमवारीत आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे.

भारतीय संघाने ओव्हल येथील अखेरच्या कसोटी इंग्लंड संघावर सहा धावांनी रोमहर्षक विजय संपादन केला. या कसोटीत मोहम्मद सिराज याने नऊ फलंदाज बाद केले. या कसोटीत त्याची सामनावीर म्हणून निवड करता आली. याचा फायदा त्याला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झाला. त्याला १२ स्थानांनी प्रगती करता आली. सिराजकडे आता ६७४ रेटिंग आहेत. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तीन कसोटी सामने खेळले; मात्र तो आताही ८८९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. बुमराखेरीज भारताचा एकही गोलंदाज अव्वल दहा क्रमवारीत नाही.

वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यानेही इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून आठ फलंदाज बाद करीत चमक दाखवली. यामुळे त्यालाही कसोटीतील गोलंदाजी क्रमवारीत २५ स्थानांनी प्रगती करता आली आहे. आता तो ५९व्या स्थानावर आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडणारा ज्यो रूट आयसीसीच्या कसोटीतील फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतके झळकावली. याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला. त्याने तीन स्थानांनी प्रगती करताना पाचव्या स्थानी मुसंडी मारली.