भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तानमध्ये खेळणे अशक्यच

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 9 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये नियोजित असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. पाक मंडळाला याची जाणीवही आहे, त्यामुळे अन्य पर्याय काय असू शकतात, याचा विचार त्यांनी सुरू केला आहे.

या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला तर आम्ही इतर देशात भारताविरुद्धची मालिका खेळण्यास तयार आहोत, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी अगोदच सांगितलेले आहे.

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टशी बोलताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध त्रयस्थ देशात कसोटी खेळायला हरकत नाही, असे विधान केले होते, त्यामुळे भारताविरुद्ध खेळण्याचा पाक मंडळाच्या इच्छा पुन्हा जागृत झाल्या आहेत. भारतात गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यास आम्ही पाकिस्तानचा संघ पाठवला होता, असाही दाखला पाक मंडळाकडून दिला जात आहे.

१९९६ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचे सहयजमानपद पाकनेही भूषवले होते. त्या स्पर्धेचा अंतिम सामना पाकमध्ये झाला होता. त्यानंतर प्रथमच त्यांच्याकडे आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे नियोजन अपेक्षित आहे; परंतु भारताचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला तर पाकमधील या नियोजित स्पर्धेचे भवितव्य कठीण असेल.

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेअगोदर झालेल्या आशिया करंडक स्पर्धेचेही यजमानपद पाकिस्तानकडे होते; परंतु भारताने तेथे खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यावर हायब्रिड मॉडेल तयार करण्यात आले, त्यामुळे मोजकेच सामने पाकमध्ये झाले तर अंतिम सामन्यासह महत्त्वाच्या लढती श्रीलंकेत झाल्या होत्या.

पाकमध्ये नियोजित असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार नाही, असे संकेत बीसीसीआयकडून देण्यात येत आहेत, त्यामुळे पाक मंडळाला पुन्हा एकदा हायब्रिड मॉडेलचा सहारा घ्यावा लागेल. परिणामी, भारत-पाक हा हायव्होल्टेज सामना पाकऐवजी दुबई किंवा अबुधाबी येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित शर्माने आपले मत मांडलेले असले तरी पाकविरुद्ध त्रयस्थ देशातही कसोटी मालिका किंवा अन्य मालिका अशक्य असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.