झहीरकडून शिकलो रिव्हर्स स्विंगची कला - जेम्स अँडरसन

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 4 Months ago
झहीर खान आणि जेम्स अँडरसन
झहीर खान आणि जेम्स अँडरसन

 

वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट मिळवणारा आणि सर्वाधिक कसोटी खेळणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या यशातील काही श्रेय भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानला दिले आहे. रिव्हर्स स्विंगसह काही कला मी झहीर खानकडून शिकलो, असे तो म्हणाला.

वयाच्या ४१ व्या वर्षांतही इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहत असलेला जेम्स अँडरसन सर्वाधिक कसोटी विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यापेक्षा थोडासा मागे आहे, पण वेगवान गोलंदाजांमध्ये त्याने मिळवलेल्या विकेट सर्वाधिक आहेत. मी झहीर खानची गोलंदाजी बारकाईने पाहायचो. त्यातून बरेच काही शिकलो. रिव्हर्स स्विंग कसा करायचा. तसेच रिव्हर्स स्विंग करताना चेंडू हातामध्ये कसा लपवायचा. जेव्हा जेव्हा झहीर खानविरुद्ध खेळायचो तेव्हा या गोष्टींकडे मी बारकाईने लक्ष ठेवायचो, असे अँडरसनने सांगितले.

अँडरसन बहरात असताना झहीर खान २०१४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला. झहीर खाननंतर अँडरसनने जसप्रीत बुमराचेही कौतुक केले. सध्याच्या वेगवान गोलंदाजांमध्ये रिव्हर्स स्विंग करण्यात बुमरा मातब्बर असल्याचे अँडरसन म्हणतो. दुसऱ्या कसोटीत बुमराच्या मॅचविनिंग कामगिरीबाबत विचारले असता अँडरसन म्हणाला, ‘‘बुमरासारख्या गोलंदाजांनी एक वेगळी उंची निर्माण केलेली आहे. भारतात रिव्हर्स स्विंगचे महत्त्व फारच अधिक आहे आणि त्यामध्ये बुमराने हुकूमत मिळवलेली आहे, त्याच्याकडे वेग आणि अचूकताही अफलातून आहे.’’

दुसऱ्या कसोटीत ऑली पोपला बुमराने टाकलेला यॉर्कर कोणीही विसरू शकत नाही. तो अपवादात्मक चेंडू नव्हता तर अशा अनेक यॉर्करवर त्याने भल्याभल्या फलंदाजांच्या यष्ट्या उखडलेल्या आहेत. त्यामुळे बुमराने अशा प्रकारे तिखट आणि भन्नाट मारा केला तर आश्चर्य वाटायला नको, असेही अँडरसनने सांगितले.

टी-२० च्या वाढत्या सामन्यांमुळे रिव्हर्स स्विंगची कला लुप्त होत आहे का, या प्रश्नावर अँडरसनने नकारात्मक उत्तर दिले, तो म्हणतो, अधिक प्रमाणात आता टी-२० प्रकाराचे सामने होत असल्यामुळे यॉर्कर, हळूवार चेंडू (स्लोअर वन) असे वेगवेगळे प्रकारचे चेंडू टाकण्यावर भर असतो; परंतु कसोटी क्रिकेटमध्ये स्विंग आणि रिव्हर्स स्विंगचे महत्त्व कमी होऊच शकत नाही. बुमरा आणि मोहम्मद शमी, सिराज यांच्यासारखे विख्यात गोलंदाज फारच कमी आहेत, पण मी त्यांच्यात ईशान शर्माचे नाव आवर्जून घेईन. त्याच्याकडेही इतकीच प्रतीभा होती.