घुसखोरी करणारे १२ दहशतवादी यमसदनी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 9 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने घुसखोरी आणि हल्ल्यांचे प्रयत्न वाढवले आहेत.  भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला असून काल रात्री सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय ठिकाणांवर गोळीबार सुरू केला.

त्याचवेळी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु सतर्क असलेल्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जैश-ए-मोहम्मदच्या १० ते १२ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. बीएसएफने सीमेवर गस्त वाढवली असून पाकिस्तानच्या नापाक कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जवान सज्ज आहेत.

सांबा सेक्टरमधील चकमक
रात्री आठ वाजता पाकिस्तानी सैन्याने सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू केला. त्याचवेळी ड्रोन हल्ल्यांचाही प्रयत्न झाला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराच्या आड स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. बीएसएफच्या जवानांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत तात्काळ प्रत्युत्तर देत जवानांनी दहशतवाद्यांना चकमकीत गुंतवलं.

४० मिनिटांची धुमश्चक्री
रात्री साडेअकराच्या सुमारास दहशतवाद्यांनी सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मात्र बीएसएफने जोरदार गोळीबार सुरू केला आणि प्रतिउत्तर दिले. दोन्ही बाजूंनी ४० मिनिटं गोळीबार सुरू होता. बीएसएफच्या जवानांनी शौर्य दाखवत दहशतवाद्यांचा डाव उधळला. सूत्रांनुसार, १० ते १२ दहशतवादी ठार झाले आहेत. 

अधिकाऱ्यांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या स्पष्ट केलेली नाही. पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमची (BAT) ही कारवाई असण्याची शक्यता आहे. BAT मध्ये पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी एकत्र काम करतात. अशा कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफ सज्ज आहे.

बीएसएफची वाढीव गस्त
सीमेलगतच्या भागात बीएसएफने गस्त वाढवली असून सांबा, जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या सीमांवर जवान सतर्क आहेत. पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जातंय. तसेच ड्रोन आणि इतर हल्ल्यांना रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter