IPL 2024 : दिल्लीविरुध्दच्या सामन्यात धोनीचा 'हा' महारेकॉर्ड

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग धोनी

 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात एमएस धोनीला पहिल्यांदाच फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. शेवटी त्याने आक्रमक फटकेबाजी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आव्हान मोठं असताना धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानंतर त्याने चौकार - षटकार खेचत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्याने २३१.२५ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत १६ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.

एमएस धोनी आपल्या फिनिशिंग स्टाईलसाठी ओळखला जातो. शेवटच्या षटकांमध्ये येऊन तो आक्रमक खेळ करून संघाला विजय मिळवून देतो. या सामन्यादरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील १९ व्या आणि २० व्या षटकात फलंदाजी करताना १०० षटकार पूर्ण केले आहेत.

असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कुठल्याच फलंदाजाला करता आला नव्हता. वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज कायरन पोलार्ड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पोलार्डने १९ व्या आणि २० व्या षटकात फलंदाजी करताना ५७ षटकार मारले आहेत. एमएस धोनी या यादीत ४३ षटकारांनी आघाडीवर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज (१९ व्या आणि २० व्या षटकात)
१) एमएस धोनी - १०० षटकार
२) कायरन पोलार्ड - ५७ षटकार
३) एबी डीव्हीलियर्स - ५५ षटकार
४) हार्दिक पंड्या - ५५ षटकार
५) आंद्रे रसल - ५१ षटकार
६) रविंद्र जडेजा - ४६ षटकार

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नईला हरवत दिल्लीने आपलं विजयाचं खातं उघडलं आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकअखेर १७१ धावा करता आल्या.