आजपासून घुमणार कबड्डीचा आवाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 7 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमाचा दम आजपासून घुमणार आहे. अहमदाबादमध्ये गुजरात जायंटस्‌-तेलुगू टायटन्स यांच्यामधील लढतीने या पर्वाचा श्रीगणेशा होणार आहे. पहिल्या दिवशी यू मुंबा-यूपी योद्धा यांच्यामध्ये अन्य लढत पार पडणार आहे. दोन डिसेंबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा २१ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. प्ले-ऑफच्या लढतींचे वेळापत्रक कालांतराने जाहीर करण्यात येणार आहे.

प्रो-कबड्डी लीगमध्ये मागील पाच मोसमांप्रमाणे यंदाही १२ संघांमध्ये जेतेपदाची लढाई पाहायला मिळणार आहे. बंगळूर बुल्स, जयपूर पिंक पँथर्स, पुणेरी पलटण, पाटणा पायरेटस्‌, यु मुंबा, तेलुगू टायटन्स, बंगाल वॉरियर्स, दबंग दिल्ली, गुजरात टायटन्स, हरियाना स्टीलर्स, तमिळ थलैवाज, युपी योद्धा हे बारा संघ अजिंक्यपदासाठी झुंजणार आहेत. दोन ते सात डिसेंबर या कालावधीत अहमदाबादमध्ये या स्पर्धेच्या लढती होणार आहेत.

त्यानंतर बंगळूर, पुणे, चेन्नई, नॉयडा, मुंबई, जयपूर, हैदराबाद, पाटणा, दिल्ली, कोलकाता व पंचकुला येथे टप्प्याटप्प्याने या स्पर्धेतील लढतींचा थरार रंगणार आहे. प्रो-कबड्डी लीग या स्पर्धेत आतापर्यंत पाटणा पायरेटस्‌ या संघाने सर्वाधिक तीन वेळा अजिंक्यपद पटकावले आहे.