IPL 2024 : 'या' कृतीतून शाहरुख खानने दाखवली खिलाडूवृत्ती

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 14 d ago
शाहरुखने बटलरचे केले अभिनंदन
शाहरुखने बटलरचे केले अभिनंदन

 

आयपीएल 2024 स्पर्धेत 31 व्या सामन्यात मंगळवारी (16 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर 2 विकेट्सने पराभूत केले. राजस्थानच्या या विजयात जॉस बटलरने शतक करत मोलाचा वाटा उचलला.

अखेरच्या चेंडूपर्यंतत रंगलेल्या सामन्यात आपल्या संघाला प्रोत्साहन देणारा कोलकता संघाचा सहमालक आणि अभिनेता शाहरुख खान याने सामन्यानंतर लगेचच प्रतिस्पर्धी संघातील मॅचविनर जॉस बटलरचे कौतूक आणि अभिनंदही केले.

ईडन गार्डनवर होणाऱ्या आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्यांना हजेरी लावणारा शाहरुख खान मंगळवारीही उपस्थित होता. कोलकता संघ विजयाकडे मार्गक्रमण करत असेपर्यंत शाहरुख आनंदी होता, परंतु बटलरने विजयी चौकार मारल्यानंतर काही क्षणासाठी हिसमुसलेल्या शाहरुखने क्षणार्धात उभे राहून टाळ्या वाजवून बटलरचे कौतूक केले.

सामन्यानंतर मैदानावर येताच शाहरुखने बटलरचे अलिंगन देत दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मिडियावर कौतूक होत आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्यानंतर शाहरुख आपल्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि त्याने संघाचे मनोबल वाढवले. पराभवामुळे खचून जाऊ नको किंवा निराशही होऊ नका, खेळात असे दिवस येतात जेव्हा खराब कामगिरी न करताही आपल्याला पराभवाचा सामना करावा लागतो, तर कधी कधी याच्या विरुद्धही घडत असते त्यामुळे प्रयत्न करत रहाणे आपल्या हाती असते, असे शाहरुख म्हणाला.

कोलकाताचा अखेरच्या क्षणी पराभव
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 बाद 223 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून सुनील नारायणने सलामीला फलंदाजी करताना 56 चेंडूत 109 धावांची खेळी केली. त्यानंतर 224 धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्सने डावाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.राजस्थानकडून जॉस बटलरने 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली.

गोलंदाजीत राजस्थानकडून गोलंदाजीत अवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कोलकाताकडून हर्षित राणा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.