IPL 2024 : हैदराबाद विरुद्ध बंगळुरू सामन्याने रचला इतिहास

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 13 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये सोमवारी (१५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदाराबाद संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने २५ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २८७ धावा केल्या होत्या, तर २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूने २० षटकात ७ बाद २६२ धावा केल्या.

त्यामुळे या सामन्यात ४० षटकात तब्बल ५४९ धावांचा पाऊस पडला. इतकेच नाही तर या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मिळून १९ चौकार आणि २२ षटकार मारले, तर बेंगळुरूच्या फलंदाजांनी मिळून २४ चौकार आणि १६ षटकार मारले, असे मिळून या सामन्यात तब्बल ८१ चेंडू सीमापार गेले.

यामुळे टी२० क्रिकेटमध्ये मात्र नवे इतिहास रचले गेले. एका टी२० सामन्यात सर्वाधिक धावा होण्याचा नवा विश्वविक्रम या सामन्याने रचला. यापूर्वी हा विक्रम सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ मध्येच हैदराबादला झालेल्या सामन्याच्या नावावर होता. त्या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून ५२३ धावा झाल्या होत्या.

याशिवाय एका टी२० सामन्यात सर्वाधिक बाऊंड्री मारण्याच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी हैदराबाद-बेंगळुरू सामन्याने केली आहे. २०२३ मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघात सेंच्युरियनला झालेल्या टी२० सामन्यातही ८१ बाऊंड्री मारण्यात आल्या होत्या.

एका टी२० सामन्यात सर्वाधिक धावा
५४९ धावा - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु; बेंगळुरू, २०२४

५२३ धावा - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स; हैदराबाद, २०२४

५१७ धावा - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका; सेंच्युरियन, २०२३

५१५ धावा - मुलतान सुलतान विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स; रावळपिंडी, २०२३

५०६ धावा - सरे विरुद्ध मिडलसेक्स; द ओव्हल, २०२३

एका टी२० सामन्यात सर्वाधिक बाऊंड्री
८१ बाऊंड्री - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु; बेंगळुरू, २०२४

८१ बाऊंड्री - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०२३

७८ बाऊंड्री - मुलतान सुलतान विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स, रावळपिंडी, २०२३