सोलापूरच्या सय्यद यांनी बनवलेली सायकल ठरत आहे दिव्यांगासाठी वरदान

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 3 Months ago
Farukh Sayyad
Farukh Sayyad

 

प्रज्ञा शिंदे,
 
दिव्यांगाना दिव्यांगत्वावर मात करुन स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा आत्मनिर्भरपणा यावा, तसेच त्यांना सायकल चालवण्यासाठी सोयीस्कर व्हाव, यासाठी सोलापूरच्या सातवी शिकणाऱ्या पठ्ठ्यानं एक अशी सायकल बनवली आहे, जी आता अपंगांसाठी वरदान ठरत आहे.

सोलापूरचे फारुख सय्यद तीन दशकांपासून सायकल दुरुस्तीचे काम करत आहे. आज पर्यंत त्यांनी सायकलवर विविध प्रयोग केले आहेत. त्यातील काही प्रयोग यशस्वी देखील झाले आहेत.यातलाच हा एक प्रयोग. दिव्यांगांना व्यवसाय करता यावा, यासाठी चक्क सायकलवरच दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे दिव्यांग लोक सायकलवर आपले दुकान थाटून स्वाभिमानाने जीवन जगू शकणार आहेत.

पुण्याच्या रोटरी क्लबने दिव्यांगाना सायकलवर बसून त्यांचा व्यवसाय करता यावा यासाठी सायकलवर चालवता येणाऱ्या दुकानाचे मॉडेल उपलब्ध करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सोलापूरचे सायकल डिझायनिंग व मॉडिफिकेशनचे काम करणारे फारुख सय्यद यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा सय्यद यांनी त्यावर काम करण्यास सुरवात केली. आणि आता दिव्यांगासाठी सायकलवरील चालते दुकान तयार झाले आहे. त्याचा उपयोग करून कोणताही दिव्यांग आता सहजपणे या वाहनाच्या मदतीने व्यवसाय करू शकतो. 

फारुख सय्यद हे सायकल बनवण्या मागच्या प्रेरणे बद्दल सांगताना म्हणतात, “ लहानपणापासूनच आपल्या देशासाठी, सभोवतालच्या लोकांसाठी काहीतरी करावे असं माझं स्वप्न होते. पुण्याच्या रोटरी क्लबमुळे मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.”

 
ते म्हणतात, “अपंग लोकांसाठी पुणे रोटरी क्लब या अशा सायकलींचे मोफत वाटप करत आहे, हे मला समजल्यावर मला फार आनंद झाला. यांनी मला काम देण्या अगोदर पाच ते सहा सायकल इतरांकडून बनवून घेतल्या होत्या, मात्र त्यांना त्यांचं काम आवडलं नाही. त्यानंतर त्यांनी मला संपर्क केला. आणि जेव्हा मला कळालं की अपंगांसाठी सायकल बनवायची आहे, तेव्हा तर मला हे जास्तच आवडलं आणि मी लगेच तयार झालो.” 

सय्यद स्वतःच्या स्वप्नाबद्दल सांगताना म्हणतात, “मला लहानपणापासून अपंग लोकांसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. यामुळे मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.”

सय्यद यांना सायकल बनवताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले, याबद्दल विचारले असता ते सांगतात कि, “अपंगांसाठी जी सायकल तयार केली जाते, त्या सायकलचे वजन जास्त असल्यामुळे ती हाताळणे अपंग लोकांना त्रासदायक जाते. तसेच त्यासाठी त्यांना सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. हा सगळा विचार करून मी या सायकलचे वजन कमी कसे करता येईल या दिशेने विचार करायला सुरुवात केली आणि नवीन प्रयोग करायला सुरुवात केली.”
 

 
सायकलच्या वजनाबद्दल सांगताना सय्यद म्हणतात, “वजन जास्त झालं तर ते लोक सायकल चालवणार कसे आणि अनेकदा पाहिलं की अपंग लोकांना त्यांच्या सायकल हलवण्यासाठी किंवा कुठेही ये-जा करण्यासाठी दरवेळी मदतीसाठी लोक उपलब्ध नसतात. त्यामुळे सायकलचा वजन कमी असलं पाहिजे यावर मी जास्त लक्ष दिलं आणि पोकळ पाईप चा वापर केला.”

पुढे ते म्हणतात, “सायकल जरी मोठी असली तरी तिचं वजन हलकं पाहिजे आणि ती चालवायला सोपी गेली पाहिजे, या दृष्टीने मी संशोधन केलं आणि मी केलेल संशोधन यशस्वी झालं. वीस ते पंचवीस लोकांना मी बनवलेल्या सायकली ट्रायल म्हणून वापरायला दिल्या, त्यांनाही त्या सोप्या वाटल्या.”

३० ते ३२ वर्षांपासून सायकलवर विविध प्रयोग करत असल्याचे सांगत त्यांनी एक खंत ही व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “युट्युबवर मी जेव्हा वेगवेगळे व्हिडिओ पाहिले; तेव्हा माझ्या लक्षात आलं की, माझ्या अनेक कल्पना लोकांनी चोरी केल्या आहेत.” मात्र आता फारुख सय्यद यांना या सायकलच पेटंट मिळालेला आहे. आपणही इतरांच्या कामी यावं, आपली ही इतरांना मदत व्हावी, हे देशभक्तीचं असलेल स्वप्न फारुक सय्यद यांच आता पूर्ण झालय.

 
फारूक सय्यद यांनी केलेल्या या प्रयोगाला यश मिळालेलं आहे. त्यांनी नव्याने बनवलेली सायकल वजनाने हलकी आहे आणि ती अपंगांसाठी खऱ्या अर्थाने आधार बनली आहे. ही सायकल वापरणारे अनेक लोक सांगतात की,‘ सायकल हलकी असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि या सायकलने खऱ्या अर्थाने आमच्या कुबड्या काढलेल्या आहेत. या सायकलमुळे आमचा प्रवासाचा हलका झालाय.’
 
ही सायकल बनवल्याने आज बाजूच्या परिसरातील अनेक अपंग व्यक्ती सय्यद भाईंवर खूप खुश आहेत. सायकल हलकी केल्यामुळे, होणारा त्रास कमी झाल्यामुळे अनेक अपंग व्यक्ती फारूक सय्यद यांना आता आशीर्वाद देत आहे.

कशी आहे ही सायकल 
  • सहा फूट उंचीची दुकानाची फ्रेम
  • सायकल चालवण्याचा हलकेपणा ९० टक्क्यापर्यंत वाढवला
  • किमान १५ बरण्या दुकानात ठेवता येतील.
  • दोन्ही बाजूने पाऊच अडकविण्याची सुविधा
  • हलक्या वजनाच्या पोकळ पाइपचा वापर
  • २० दिवसात सायकलचे डिझाईन तयार केले
 
काय आहेत सायकलची वैशिष्ट्ये 
  • सायकल चालवण्यासाठी सोपी 
  • सायकलचा दर माफक आहे 
  • सायकल वरून छोट्या मोठ्या व्यवसायही करू शकतो 
  • वजनात हलके असल्याने त्रास कमी 
 
-प्रज्ञा शिंदे

( [email protected] )


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter