काश्मीर घडवले आणि बिघडवले

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
‘गिल्डेड केज : इयर्स दॅट मेड ॲन्ड अनमेड काश्मीर’
‘गिल्डेड केज : इयर्स दॅट मेड ॲन्ड अनमेड काश्मीर’

 

पुस्तकाचे ‘गिल्डेड केज : इयर्स दॅट मेड ॲन्ड अनमेड काश्मीर’ हे नावच बोलके, कुतुहल जागृत करणारे आहे. ज्या वर्षांनी काश्मीर घडवले आणि बिघडवले, त्याची ही कहाणी आहे.
 
राज्यघटनेचे कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीर जास्तच चर्चेत आहे. काश्मीरबाबत खूप माहिती तसेच तेथे जे काही घडले, ते का, कसे हेही पुस्तकातून कळते. मूळचे काश्मिरी, विविध माध्यमांचा अनुभव असलेले ज्येष्ठ लेखक-पत्रकार संदीप बामझाई यांनी मेहनतीने संशोधन करून पुस्तक लिहिले आहे, ते मायभूमीच्या ओढीने. दुसरे कारण अधिक महत्त्वाचे. त्यांचे आजोबा के.एन. बामझाई ‘ब्लिट्झ’ नियतकालिकाचे दिल्ली विभागातील प्रमुख, नेहरूंचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) आणि जम्मू-काश्मीरचे पहिले पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांचे स्वीय सचिव आणि पुन्हा दीर्घकाळ काश्मीरसंदर्भात नेहरूंचे ओएसडी होते. त्यांच्या संग्रहातील कागदपत्रांतील महत्त्वपूर्ण नोंदींचा उपयोगही लेखकाने केला आहे. पुस्तकासाठी जाणीवपूर्वक १९३१ ते १९५३ या कालखंडाची निवड केली. कारण याच काळात डोग्रा राजघराण्याच्या राजा हरिसिंग यांच्या दडपशाहीने हैराण जनतेने त्याविरोधात आवाज उठवला. त्यांचे नेतृत्व कट्टर जीनाविरोधक नॅशनल कॉन्फरन्सच्या शेख अब्दुल्लांकडे होते. हा त्यांचा उदय होता. नंतर त्यांच्या विचारसरणीत कसा बदल घडला हेही कळते. यामुळेच १९५३मधील त्यांच्या अटकेबरोबरच या पुस्तकाचा शेवट केला आहे, असे लेखक म्हणतो.
 
लेखकाने काश्मिरवर पुस्तकांची त्रिपेडी रचली त्यातील हे शेवटचे पुस्तक. याआधाची दोन पुस्तके ‘बोनफायर ऑफ काश्मिरियतः डीकन्सट्रक्टिंग द ॲक्सेशन’ आणि ‘प्रिन्सिस्तान : हाऊ नेहरू, पटेल ॲन्ड माऊंटबॅटन मेड इंडिया’ (कलिंग पारितोषक विजेते). शेख महमद अब्दुल्लाः द शेर-ई-काश्मिर, द कश्मिर वॉर, द फॉरिन हॅन्ड : अमेरिकन्स इन काश्मिर आणि थिंग्ज फॉल अपार्ट : द काश्मिर प्लॅन अशी एकूण सात प्रकरणे आणि शेवटी सूची आहे. हे पुस्तक वाचल्यावर जीनांचे काश्मिर पाकिस्तानने ताब्यात घेण्याचे स्वप्न राजा हरिसिंगांचे पंतप्रधान रामचंद्र काक यांनी खुशीने पुरे केले असते, ते स्वप्न शेख अब्दुल्लांनी कसे उद्ध्वस्त केले, त्यांनीच नेहरूंना लष्कर पाठवून कथित घुसखोर टोळीवाल्यांचे काश्मिर बळकावण्याचे प्रयत्न हाणून पाडायला कसे सांगितले आणि अखेर अब्दुल्ला स्वतःच जम्मूशिवाय स्वतंत्र काश्मिरच्या स्वप्नात अडकले. त्यांनी नेहरूंच्या विशाल भारताला विरोध केल्याने त्यांच्या जागी त्यांचे उपपंतप्रधान, नेहरूंचे काश्मिरमधील डोळे आणि कान असलेले बक्षी गुलाम अहमद यांची नियुक्ती कशी केली, हे सारे उलगडत जाते. अब्दुल्ला यांनी स्वतंत्र काश्मिरची भूमिका अमेरिकेपुढेही मांडली होती. कारण अमेरिकेच्या डावपेचांत काश्मिरच्या स्थानमाहात्म्यामुळे खूपच महत्त्व आले असते. अमेरिकन राजदूताच्या पत्नीला ते ही कल्पना सांगत होते, पण बक्षी गुलाम ते ऐकत असतील आणि ती लगोलग नेहरूंपर्यंत पोहोचेल याची त्यांना कल्पना नव्हती. अशा प्रकारची माहिती या पुस्तकातून मिळते.
 
यातील महत्त्वाचे प्रकरण ‘काश्मिर वॉर’ आहे. वायव्य सरहद्द प्रांताचे राज्यपाल सर जॉर्ज कनिंगहॅम यांनी अफगाण टोळीवाल्यांनी पठाणिस्तानची मागणी रेटू नये यासाठी त्यांना काश्मिरकडे वळवण्याचा डाव रचला. त्यासाठी पाकिस्तान सैन्याने सारी रसद पुरवली. लियाकत अलींनी अब्दुल्लांना बोलण्यांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि त्याकाळात पाक सैन्याधिकाऱ्यांनी आक्रमणाची तयारी जोरात करायची अशी योजना होती. आपण याबाबतच्या धोक्याची कल्पना अफ्रिदी आणि महमदी टोळ्यांना दिली होती, असे कनिंगहॅम यांनी डायरीत नोंदवले आहे.
काश्मिरच्या निर्वाणीच्या मदतीच्या हाकेला भारताने प्रतिसाद दिला. ते राज्य भारताचा भाग झाले, हरिसिंग यांना तेथून जम्मू आणि नंतर मुंबईत नेले. भारताच्या फौजा विमानाने काश्मिरला धाडल्या. कडाक्याच्या थंडीत बर्फाने वेढलेल्या झोजी लामध्ये रणगाडे आणि पायदळाद्वारे प्रतिहल्ल्याची सुरुवात करण्यात आली. स्वतः आघाडीवर राहून जनरल थिमय्यांनी त्यांचे नेतृत्व केले. ज्या भागात रणगाडे जाण्यास पुरेसा मार्ग नव्हता तेथे सुटे भाग करून नेण्यात आले. झोजी ला मुक्त केल्यावर कारगिलला जाण्याचा मार्ग खुला झाला. लडाख सुरक्षित राहिला. कारगिलमध्ये मुक्ती फौजांचे जोरदार स्वागत झाले. पाकिस्तानी फौजी अधिकाऱ्यांना या उंचीवर रणगाडे येतील अशी अपेक्षाच नव्हती. ते भांबावले. दारुगोळा, रसद टाकून घाईघाईत त्यांनी माघार घेतली. शब्दमर्यादेत यापेक्षा जास्त सांगणे अवघड आहे. ते पुस्तकातूनच वाचायला हवे.
 
गिल्डेड केज : इयर्स दॅट मेड ॲन्ड अनमेड काश्मीर
लेखक : संदीप बामझाई,
प्रस्तावना : डॉ. करण सिंग,
प्रकाशक : रूपा पब्लिकेशन्स, पाने: १६८; किंमत ३९५ रुपये.
 
सौजन्य दै.सकाळ