मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या पुरस्कारांची घोषणा

Story by  Awaz Marathi | Published by  sameer shaikh • 1 Years ago
 पुरस्कारार्थी डॉ. झहीर काझी आणि वसीमा शेख
पुरस्कारार्थी डॉ. झहीर काझी आणि वसीमा शेख

 

साहित्यिक आणि समाज सुधारक हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाला येत्या २२ मार्च २०२३ रोजी ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मुस्लीम सत्यशोधक पत्रिका वर्धापनदिन विशेषांकाचे आणि मंडळाचे उदिष्ट भूमिका व जाहिरनामा विषद करणाऱ्या ‘Muslim Satyashodhak Mandal : Aims - Prespective and Manifesto’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. वर्धापनदिनानिमित्त, दर दोन वर्षांनी दिले जाणारे हमीद दलवाई समाज प्रबोधन पुरस्कार आणि सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्कार यावर्षी अनुक्रमे डॉ. झहीर काझी आणि वसीमा शेख या पुरस्कारार्थींना प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कारार्थींविषयी थोडक्यात...
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे भूतपूर्व अध्यक्ष, आणि गांधीवादी नेते बद्रुद्दीन तय्यबजी अंजुमन-ए-इस्तामचे संस्थापक अध्यक्ष होते. मुंबईतील या संस्थेच्या स्थापनेला यावर्षी १५० वर्षे पुर्ण होत आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त मा. डॉ. झहीर काझी (मुंबई) यांना शिक्षण, समाज आणि वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल ‘हमीद दलवाई समाजप्रबोधन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. 
 
मराठवाडयासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः मुस्लीम मुलींना शिक्षण घेताना विविधांगी समस्यांना सामोरे जावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन करणाऱ्या वसीमा हैदरसाब शेख यांनी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. अमरावतीच्या विद्यमान उपजिल्हाधिकारी असलेल्या वसीमा यांना त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासासाठी आणि मिळवलेल्या यशासाठी ‘सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. 

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांत सकारात्मक आणि सक्रिय भूमिका घेणाऱ्या सुप्रसिध्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

विशेष व्याख्यान 
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले जाते. मुस्लीम समाजाशी संबंधित विषयांचा या व्याख्यानातून वेध घेण्यात येतो, त्यामुळे या व्याख्यानाचे विशेष महत्त्व असते. 
 
या वर्षी, ‘अमृतमहोत्सवी वर्षातील भारत आणि पसमांदा मुस्लिमांच्या समस्या’ या सध्या चर्चेत असणाऱ्या विषयावर पटना (बिहार) येथील प्रसिद्ध लेखक, पत्रकार, सामाजिक सबलीकरणासाठी प्रयत्नशील असणारे कार्यकर्ते, ऑल इंडिया पसमांदा मुस्लीम महाजचे राष्ट्रीय नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार अली अन्वर अन्सारी यांचे विशेष व्याख्यान देणार आहेत.

उपस्थिती 
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेत साक्षीदार राहीलेले मार्गदर्शक ज्येष्ठ सत्यशोधकी कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती असेल. तर मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 

मंडळाचे आगामी उपक्रम
हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनी म्हणजे ३ मे रोजी मंडळाच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर याठिकाणी विभागीय परिषदांचे आयोजन आयोजन केले जाणार आहे.  

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण 
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम बुधवार दि. २२ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, गांजवे चौक, पुणे येथे होणार आहे.