अदानी उद्योग समूहाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी या मागणीमुळे संसदेमध्ये आजही विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्याने सलग चौथ्या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही.
लोकसभेत कामकाजाला सुरवात झाल्याच्या काही मिनिटातच लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना सभागृह दुपारी दोनपर्यंत तहकूब करावे लागले. तर दुपारी दोन नंतरही याच गोंधळाची पुनरावृत्ती झाल्याने अखेरीस उद्यापर्यंत कामकाज थांबविण्याचा निर्णय पीठासीन अधिकारी किरीट सोळंकी यांनी घेतल्याने राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेला आजही मुहूर्त लागू शकला नाही. केवळ शासकीय कागदपत्रे सभापटलावर मांडण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेस सह द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना (ठाकरे गट), तृणमूल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, आम आदमी पक्ष, भारत राष्ट्र समिती, माकप, भाकप आदी विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करून मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. आज सकाळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची दोन्ही सभागृहातील संयुक्त रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाली. त्यामध्ये जेपीसीच्या मागणीवर ठाम राहण्याचा एकमताने निर्णय झाला.
राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने विरोधक अदानी उद्योग समूह आणि मोदी सरकारमधील संबंध तसेच ‘बीबीसी’च्या माहितीपटावरील बंदी मुद्दे उपस्थित करतील, असे कालच तृणमूल काँग्रेसने जाहीर केले होते. त्यामुळे दुपारनंतर कामकाज सुरळीत चालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु गदारोळात कामकाज स्थगित झाले. सभागृह सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षांचे सदस्य घोषणाबाजी करत वेलमध्ये धावले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना घोषणाबाजी थांबवून सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. हव्या त्या विषयावर चर्चा करा, परंतु केवळ नियोजनपूर्वक कामकाज रोखले जात आहे अशी नाराजी देखील ओम बिर्ला यांनी व्यक्त केली. तर दुपारी दोन नंतर पीठासीन अधिकारी सोळंकी यांनी या खासदारांना वारंवार आवाहन केले. तर, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही विरोधी सदस्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावर चर्चा करण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन केले. ज्या सदस्यांना (अदानी मुद्द्यावर) बोलायचे आहे, ते आभार प्रस्तावावरील चर्चेत बोलू शकतात. सर्वप्रथम अभिभाषणावरील चर्चेची परंपरा पाळली जावी, असे त्यांचे म्हणणे होते.