पावसाचा इशारा: कुठे काय आहे स्थिती?

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 9 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुणे - गेल्या तीन दिवसांपासून कोकण आणि पूर्व विदर्भाला पावसाने झोडपले. गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंत रायगडमधील माथेरान येथे उच्चांकी ४०० मिलिमीटर तर, ताम्हिणी घाटात ३५० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे.

 

तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर कमी असल्याने शेतीकामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस पडला. पवयंजे येथे सर्वाधिक ३४१ मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडला. यामुळे कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, जगबुडी या नद्यांनी पाणी पातळी ओलांडली आहे.

 

त्यामुळे रोहा, कोलाड, गोवे, पुई, वाकण, खारगाव, घटाव, नागोठाणे, पाली, उन्हेरे, महाड, राजेवाडी, दासगाव, खारपाडा, रावे, दादर, गुळसुंदे, मोहपाडा, दूरशेत, खेड शहर, अलसुरे, चिचघर, प्रभुवाडी अशी काही गावे बाधित झाली आहेत. तर उल्हास, गाढी, सूर्या, वाशिष्टी या नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.

 

परंतु बाधित गावामध्ये शेतात पाणी गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे येत आहे. रायगडमधील इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याने अनेक घरे मातीखाली दबली आहेत.

 

मध्य महाराष्ट्रात जोरदार

मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. जळगाव, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ३१० मिलिमीटर पाऊस पडला असून पूर्व भागात पावसाने काहीशा तुरळक सरी पडल्या.

 

सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भाग आणि नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, नगर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर जळगाव जिल्ह्यात कमीअधिक स्वरूपात पाऊस होता. गुरुवारी दिवसभर या भागात उघडीप दिली होती. काही वेळा अधूनमधून ऊन पडत होते.

 

मराठवाड्यात तुरळक सरी

मागील काही दिवस मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोपडले होते. परंतु आता या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव अशा सर्वच जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव कमी झाला असून अनेक ठिकाणी चांगलीच उघडीप दिली आहे. परंतु मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे पिके चांगलीच तरारली आहेत.

 

विदर्भात पावसाचा जोर ओसरला

पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत मागील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला. आता अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला असून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

 

या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत असून या भागातील राखेचा बंधारा फुटल्याने अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, अकोला या जिल्हयात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या असून काही ठिकाणी शिडकावा झाला.

 

वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

हिंगोली - तालुक्यातील लोहगाव व डिग्रस कऱ्हाळे परिसरात मंगळवारी (ता. १८) अतिवृष्टी झाल्याने लोहगाव गावाजवळील नदीवरील पूल तुटला होता. यावेळी लोहगाव येथील शेतकरी दिगंबर पारोकर हे नदीच्या पुरात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह गुरुवारीहिवरा गावाजवळ आढळला. पूल तुटल्यामुळे ते नदीपात्रातून जात होते.

 

पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू

डहाणू (जि.पालघर) - तालुक्यातील चिंचणी येथे पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण संखे (४७) असे मृताचे नाव आहे. चिंचणी येथून बुधवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास ते अन्य दोघांसह मोटारीने चिंचणीहून वाणगावकडे जात होते. कोलवली खांजणातील पुलावरून पाणी वाहत असताना मोटार वाहत जाऊन खड्ड्यात पडली.

 

इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

भाईंदर (जि.ठाणे) - सततच्या पावसामुळे भाईंदर पूर्वेतील ‘नवकीर्ती इस्टेट’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू; तर चारजण जखमी झाले आहेत. दुर्गा अवधेश राम (४७) असे मृताचे नाव आहे. ही इमारत १० दिवसांपूर्वीच धोकादायक घोषित करून ती रिकामीही करण्यात आली होती. मात्र, मृत व जखमी इमारतीखाली उभे होते.

 

राज्यातील पाऊसस्थिती

मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

गडचिरोलीत अनेक रस्ते बंद

पुणे जिल्ह्यात दुर्गम भागातील शाळा बंद

अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवरील पिके बाधित

कोकणात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले

 

अतिजोरदार पावसाचा इशारा

राज्यात आज  (ता. २१) कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा आहे. पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.