इतिहासात पहिल्यांदाच महिलेची आमदार म्हणून निवड

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
हेकानी जाखलू
हेकानी जाखलू

 

भारताच्या उत्तर-पूर्व ब्रह्मपुत्र घाटामध्ये आणि बर्मा च्या सुंदर पर्वतामध्ये वसलेले, भारत देशाचे स्विझरलँड म्हणून ओळखले जाणारे राज्य म्हणजे नागालँड. या छोट्याशा राज्यात नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली आहे.  त्याला निमित्त ठरले ते नुकत्याच पार पडलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीचे. 

नागालँडला १९६३ मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर १९६४ मध्ये तिथे पहिली विधानसभा निवडणूक झाल . मात्र आजवरच्या १३ विधानसभा निवडणुकांमध्ये  एकही महिला आमदार निवडून आलेली नव्हती. नागालँडमध्ये महिला मतदारांची संख्या (४९.७९%) पुरूषांच्या बरोबरीने असूनही महिला या आमदारकीपासून वंचित होत्या. 
 
मात्र या निवडणुकीत हे चित्र बदललं आणि नागालँडनं पहिल्यांदाच एक महिलेला विधानसभेवर निवडून देत आमदार केलं. तब्बल ६० वर्षांनी नागालँडच्या विधानसभेचे दार महिलांसाठीही खुले झाले आहे. 
 
किती जागांसाठी होती ही लढत?
नागालँडमधील १६  जिल्ह्यांतील ६०  पैकी ५९ विधानसभा जागांवर ८५.९०% मतदान पार पडले. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (Nationalist Democratic Progressive Party) हेकानी जाखलू यांनी युतीचे उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली. आणि या राज्यातील पहिल्या महिला आमदार बनल्या. त्या दिमापूर तृतीय मतदार संघातून विजयी झाल्या. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते अझेतो झिमोमी यांचा १५३६  मतांनी पराभव करून त्यांनी  विजय मिळवला.
 
मुख्यमंत्री नेफियु रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपी २०१८ च्या निवडणुकीपासून भाजपसोबत युती करत आहे. मागील निवडणुकीत ३०  जागा जिंकणारी युती सध्या ३९ वर आहे. ६०  जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा ३१ आहे. जागावाटपाच्या करारानुसार भाजपनं २० जागा लढवल्या, तर एनडीपीपीनं ४० जागा लढवल्या होत्या.
 
किती होत्या महिला उमेदवार?
नागालँड विधानसभेसाठी यंदाच्या निवडणुकीत १८३ उमेदवारांमध्ये चार महिलांचा समावेश होता. म्हणज केवळ चार महिला उमेदवारांना तिकीट मिळवण्यात यश आले. ताज्या माहितीनुसार सलहुतुनू क्रुसे या आणखी एक महिला उमेदवार पश्चिम मतदारसंघातून विजयी झाल्याआहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार केनेजाखो यांचा १२ मतांनी पराभव केला.
 
कोण आहेत हेकानी जाखलू?
हेकानी जाखलू या व्यवसायानं वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दिमापूरमधील हेकानी जाखलू यांनी दिल्ली आणि लंडन येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी तब्बल १८ वर्षे एनजीओमध्ये काम केलं आहे. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. केवळ सात महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचे पती अलिजा जाखलू दिमापूरमधील मोठे कंत्राटदार आहेत.
 
राजकारणात येण्याचा उद्देश
जाखलू यांना कोणताही राजकीय वारसा लाभलेला नाही. गावातील लोकांना वेगवेगळ्या समस्यांवर त्यांना काम करायचे आहे. गरीब व  मागासलेल्या महिलांसाठीही विशेष काम करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. त्याचाच परिपाक म्हणून त्या राजकारणात उतरल्या आणि अवघ्या सहा महिन्यांच्या प्रचाराच्या जोरावर विजयश्रीची माळ खेचून आणली. 
 
मात्र यासाठी त्यांना जीवतोड मेहनतही करावी लागली. सकाळी ६ वाजल्या पासून त्या प्रचारासाठी निघत, आणि घरी परतायला त्यांना रात्रीचे ११ वाजत. याच कष्टाचे गोड फळ त्यांना मिळाले. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ अशी बडी मंडळी प्रचारात उतरली होती. 
 
हेकानी जाखलू नागालँडच्या पहिल्या महिला आमदार म्हणून काय ठसा उमटवतात, व येणाऱ्या पिढीसाठी विशेषतः नागालँडच्या महिलांबाबत काय सकारात्मक बदल घडवून आणतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.