तब्बल सोळा वर्षांनंतर रहनुमा देणार दहावीची परीक्षा

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
रहनुमा सिद्दिकी
रहनुमा सिद्दिकी

 

निसार अली 

शिकण्याची आवड असूनही कधी आर्थिक परिस्थिती, तर कधी घरच्या विरोधामुळे अनेक मुलींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मालवणी येथील रहनुमा सिद्दिकी हिच्या आयुष्यातही दहावीच्या परीक्षेवेळी २००८ मध्ये असेच काहीसे घडले. रह्नुमाने सोळा वर्षांची असताना नववीची परीक्षा दिली. आणि त्यानंतर दहावी बोर्डाच्या तयारीला लागली. परीक्षेची तयारीही झाली होती. त्याचवेळी तिचे वडील सौदी अरेबिया वरून नुकतेच परतले होते. तिकडून परतताच त्यांनी तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशातच तिचे परिक्षेचे हॉल तिकीटही आले. हे कळताच त्यांनी चेन्नई येथील एका श्रीमंत व्यावसायिकाशी तिचे लग्न ठरवले. कुटुंबीयांच्या धाकात तिला परीक्षेला जाण्याऐवजी लग्नमंडपात बसावे लागले.

यासंबंधी फ्री प्रेसशी जर्नलशी  बोलताना, रेहनुमा म्हणाली, "मी ज्या समुदायातून येते तिथे मुलींना जास्त शिकवले जात नाही. एका विशिष्ट वयानंतर त्यांचे लग्न लावून दिले जाते. माझ्याबाबतीत ही तसेच झाले. फक्त दोन महिन्याचा विषय होता. मला परीक्षा देता यावी यासाठी आई-वडिलांना एवढ्या विनवण्या करूनही त्यांनी काहीही न ऐकता  माझे लग्न लावून दिले. लग्नानंतर सासरकडचे लोक परीक्षेसाठी जाऊ देतील, असा विश्वासही दाखवला."

मात्र लग्न झाल्यानंतर रहनुमा ही चेन्नईला गेली. तिथे तिने शिक्षणाचा ध्यास कायम ठेवला. शिक्षण पूर्ण करू द्यावे म्हणून तिने पती आणि सासऱ्यांकडे आग्रह धरला. तिची ही मागणी मान्य झाली नाही. ती चार मुलांची आई झाली तरी तिने आपले शिक्षणाचे स्वप्न सोडले नाही. शिक्षणासाठी तिच्या आग्रहामुळे तिला पती आणि दीराकडून सातत्याने मारहाण आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर २०२३ ला ती सासरचे घर सोडून मुंबईत माहेरी परतली. तिचा हा निर्णय तिच्या वडिलांनाही आवडला नाही. त्यांनी तिला परत सासरी पाठवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने त्यास नकार देत शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. यात तिला ‘सफल विकास वेल्फेअर सोसायटी’ची साथ मिळाली. संस्थापक वैशाली महाडिक यांनी धीर देत स्कील डेव्हलपमेंटमध्ये कोर्स करण्याची संधी दिली. त्यानंतर हेअर ड्रेसरचा कोर्सही पूर्ण केला. हे सर्व करत असतानाही शिक्षण पूर्ण करायचे ही जिद्द तिने कायम बाळगली होती. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी रहनुमा अखेर १६ वर्षांनंतर आज दहावीचा पहिला पेपर देणार आहे. पुढचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आणि आपल्या मुलांचेही भवितव्य उज्ज्वल करायचे, अशी इच्छा तिने बोलून दाखवली आहे. 

यासंबंधी सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या संस्थापक वैशाली महाडिक यांनी सांगितले की, 'आम्ही रहनुमाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतोय. स्कील डेव्हलपमेंटचे दोन अभ्यासक्रम पूर्ण केले. तिचा दहावीचा निकाल येईल, तेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी राहील.'

-निसार अली 

आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter