अशहर आलम / नवी दिल्ली
तेहमिना पुनवानी यांनी आपल्या आजीच्या आयुष्यातील काही दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी गोष्टी जगासमोर मांडल्या. त्यांच्या आजी म्हणजेच बेगम कुदसिया रसूल. त्या काही सामान्य महिला नव्हत्या. १९४९ मध्ये भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या संविधान सभेत त्या एकमेव मुस्लिम महिला होत्या.
निमित्त होते बेगम कुदसिया रसूल यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर तब्बल २४ वर्षांनी हा सोहळा पार पडला. तेहमिना पुनवानी या व्यवसायाने वकील आहेत आणि त्या बेगम कुदसिया यांच्या मुलीच्या मुलगी (नात) आहेत.
दिल्लीत झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात बोलताना तेहमिना म्हणाल्या, "जगासाठी त्या एक निडर राजकीय नेत्या होत्या. पण माझ्यासाठी त्या फक्त माझ्या 'अम्मीजान' होत्या. त्या अत्यंत प्रेमळ, साध्या, जमिनीशी जोडलेल्या आणि आपल्या तत्त्वांवर ठाम राहणाऱ्या होत्या."
फतव्याला भीक घातली नाही
पुनवानी यांनी तो काळ आठवला जेव्हा रसूल यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 'फतवा' काढला गेला होता. त्यावेळी घरचे लोक घाबरले होते, पण बेगम रसूल मात्र डगमगल्या नाहीत.
"जर माझे मन साफ असेल, तर कोणताही आदेश मला घाबरवू शकत नाही," असे त्या म्हणायच्या. पुनवानी यांनी ही आठवण सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
'बेगम कुदसिया रसूल - द रिमार्केबल लाईफ ऑफ द ओन्ली मुस्लिम वुमन इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली' (Begum Qudsia Rasul - The Remarkable Life Of The Only Muslim Woman In the Constituent Assembly) हे पुस्तक त्यांच्या आत्मचरित्राचे नवे रूप आहे. त्यांच्या मूळ आत्मचरित्राचे नाव 'फ्रॉम पडदा टू पार्लमेंट: द मेमॉयर्स ऑफ अ मुस्लिम वुमन इन इंडियन पॉलिटिक्स' असे होते. या पुस्तकात भारताच्या या महान नेत्याचा जीवनप्रवास आणि राजकीय वारसा मांडला आहे.
इतिहासाला उजाळा
या कार्यक्रमात पत्रकार, वकील आणि राजकीय नेते एकत्र आले होते. इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून काहीशा विस्मृतीत गेलेल्या या महिलेच्या योगदानाला उजाळा देणे, हा यामागचा उद्देश होता.
ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रात सलमान खुर्शीद, इंदिरा जयसिंग, मनीष तिवारी आणि ज्येष्ठ वकील तेहमिना पुनवानी यांचा समावेश होता.
कोण होत्या बेगम कुदसिया?
बेगम कुदसिया रसूल यांचा जन्म १९०९ मध्ये झाला होता. त्या भारताच्या संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला होत्या. त्या एक धडाडीच्या नेत्या होत्या. त्यांनी धार्मिक आधारावर आरक्षणाला विरोध केला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा दिला. तसेच महिलांच्या हॉकीला त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले.
त्या राज्यसभेवर आणि उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. तसेच त्यांनी मंत्रीपदही भूषवले होते. २००० मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजकार्य हेच कर्तव्य
१९४६ च्या संविधान सभेत एकमेव मुस्लिम महिला असण्यासोबतच त्यांनी अल्पसंख्याकांच्या समानतेसाठी लढा दिला. महिला हॉकीला चालना देण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या नावाने एक हॉकी चषकही आहे. बुरखा किंवा पडदा पद्धत सोडून देणाऱ्या त्या पहिल्या काही महिलांपैकी एक होत्या. आत्मचरित्राव्यतिरिक्त त्यांनी एक प्रवासवर्णन, महात्मा गांधींवर 'अवर बापू' हे पुस्तक आणि भोपाळच्या बेगम्सवर 'हयात-ए-कुदसी' ही पुस्तके लिहिली आहेत.
तेहमिना म्हणाल्या की, राजकीय उंची मोठी असूनही रसूल कायम जमिनीशी जोडलेल्या राहिल्या. "त्या दररोज महिलांना भेटायच्या, त्यांच्या समस्या ऐकायच्या आणि कोणताही गाजावाजा न करता त्यांच्यासाठी काम करायच्या. समाजकार्य हे त्यांच्यासाठी कर्तव्य होते, केवळ ओळख नाही."
मान्यवरांचे विचार
इतर वक्त्यांनी रसूल यांच्या जिद्दीचे कौतुक केले. ज्या काळात मुस्लिम महिलांना अनेक सामाजिक बंधनांना सामोरे जावे लागत होते, त्या काळात त्यांनी दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगे होते.
माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितले की, अनेक तांत्रिक अडचणी असूनही कुदसिया 'युनायटेड प्रोव्हिन्स असेंब्ली'मध्ये खुल्या जागेवरून निवडून आल्या होत्या. "तो एक अफाट धाडसाचा निर्णय होता," असे ते म्हणाले.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "संविधान सभेतील त्यांची उपस्थिती भारताचा खुलेपणा दर्शवते. तो काळ राजकीय आणि सामाजिक उलथापालथीचा होता."
ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी रसूल यांच्या नैतिक स्पष्टतेचे आणि संवेदनशील नेतृत्वाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "त्यांच्यात ठाम विश्वास आणि नम्रता यांचा दुर्मिळ संगम होता."
बेगम कुदसिया रसूल यांच्या योगदानाचा गौरव झालाच पाहिजे आणि त्यांना भारताच्या राजकीय इतिहासात मानाचे स्थान मिळाले पाहिजे, यावर सर्व वक्त्यांचे एकमत झाले. 'रोली बुक्स'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.