सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी
सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी

 

सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी यांचे आज (गुरुवार) वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत, (दिवंगत) न्यायमूर्ती बीवी यांनी देशभरातील महिलांसाठी आदर्श घालून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रावरही आपली छाप सोडली.

केरळमधील पंडालम येथील असलेल्या न्यायमूर्ती बीवी यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. त्यांचे शालेय शिक्षण हे पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूलमध्ये पूर्ण झाले.

पुढे त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि १४ नोव्हेंबर १९५० रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी १९५० मध्ये केरळच्या खालच्या न्यायपालिकेत आपली कारकीर्द सुरू केली. यानंतर १९८३ मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या.

कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या. यासोबतच आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मानही त्यांना मिळाला.

निवृत्तीनंतर तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी प्रथम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले. राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी तामिळनाडू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणूनही काम केले. १९९० मध्ये त्यांना डी.लिट आणि महिला शिरोमणी सारखे सन्माननीय पुरस्कार मिळाले. त्यांना भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.