पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रियल इस्टेटमध्ये स्वतःची 'जागा' निर्माण करणाऱ्या रेश्मा हाजिते

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शन करताना रेश्मा हाजिते
कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शन करताना रेश्मा हाजिते

 

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. किंबहुना सर्वच क्षेत्रांमध्ये  त्यांनी पुरुषांपेक्षा आघाडी घेतल्याचे चित्र दिसते. एकेकाळी 'चूल आणि मूल' इतक्याच परिघात बंदिस्त असणाऱ्या महिला वर्गाने स्वतःच्या हिमतीवर हे बंधन जुगारून दिले आणि सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या व्यवसायविश्वातही महिलांनी नवनवीन क्षितिजे पादाक्रांत केली. त्यात मुस्लीम समाजातील महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अशाच मुस्लीम महिला उद्योजिकांची (woman entrepreneurs) यशोगाथा 'आवाज मराठी'वरून प्रसिद्ध होत आहे. त्यापैकीच एका कर्तृत्ववान उद्योजिकेची आणि तिच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख.

 
'नारी के सहयोग बिना, हर बदलाव अधुरा है!' असं म्हटलं जात. पण आजही स्त्रीचं प्रथम प्राधान्य 'चूल आणि मुल' हेच असायला हवं, अशी समाजात काहींची मानसिकता असते. त्यातल्या त्यात जर एखादी मुस्लीम महिला नोकरी किंवा व्यवसाय करताना दिसली तर आपण अवाक होतो. मात्र, अशा अनेक चौकटी मोडण्याचं, बंधनं झुगारण्याचं काम पुण्यातील एका मुस्लीम महिलेने केलं आहे. 

समाजासाठी काहीतरी करावं, या भावनेतून वयाच्या २३व्या वर्षी तिने एक संस्था स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा अनेक विषयांवर कामही केलं. वर्षभरातच तिच्या लक्षात आलं कि संस्था चालवायची असेल, हे काम पुढ न्यायचं असेल तर त्यासाठी निधी म्हणजेच पैसा लागतो. आणि त्यासाठी सरकारवर किंवा देणगीदारांवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे संस्थेची आर्थिक बाजू मजबूत करण्याच्या उद्देशाने तिने काही मित्रांसोबत कंपनी रजिस्टर केली. आज १४ वर्षानंतर त्या कंपनीला यशशिखरावर नेण्यात ती यशस्वी झाली. इतकंच नव्हे तर तिने भारतातील पहिली ऑनलाइन प्लॉट बुकिंग सुविधाही सुरू केली आहे. ही कथा आहे पुण्यातील प्रसिध्द उद्योजिका रेश्मा हाजिते यांची.       
 
 
महत्वाकांक्षी रेश्मा सांगतात, "माझं इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच मला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधून (TCS) ऑफर आली. मी ती स्वीकारली. नोकरी करत असताना मी माझ्या वरिष्ठांचे अनुभव ऐकत असे. मीदेखील त्यांच्यासोबत कॉर्पोरेट क्षेत्राची एकेक पायरी चढत होते. साहजिकच त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता. लोकांचं निरीक्षण केल्यावर मला समजलं कि वयाचा एक टप्पा पार केल्यावर माणसाला वाटत कि आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं होत.” 
 
हा विचार रेश्मा यांच्याही मनात डोकावला. फक्त इतरांपेक्षा त्यांच्या मनात तो लवकर आला. त्यामुळे त्यांनी डॉ. नरेंद्र भारदे यांच्यासमवेत 'ध्यास' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून  त्या विविध कार्यक्रम आयोजित करत होत्या. विविध विषयांवर काम सुरु होतं. काम करत असताना एका वर्षातच त्यांच्या लक्षात आलं कि सामाजिक कार्य पुढ नेण्यासाठी त्याला आर्थिक भक्कम पाठींबा असायला हवा. संस्था चालवण्यासाठी आपल्याकडे एक व्यावसायिक मॉडेल असायला हवं. याच विचाराने त्यांनी जवळच्या चार मित्रांसोबत ‘एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या रिअल इस्टेट कंपनीची सुरुवात केली.

कौटुंबिक पार्श्वभूमी 
रेश्मा यांच्या खानदानात शिक्षक असण्याची मोठी परंपरा आहे. कुटुंबातील आणि नात्यातील तब्बल ४१ लोकं शिक्षक आहेत. त्यात रेशमाचे आई-वडील, आजी-आजोबा यांचाही समावेश होतो. त्यामुळे घरातील वातावरण आधीपासूनच शैक्षणिक होतं. त्यांच्या पालकांना नेहमी असं वाटायचं की आपल्या मुलांनी पारंपारिक नोकरी न करता काहीतरी वेगळं, नवीन करायला हवं. टीसीएसमध्ये नोकरी करत असतानाच स्वतःच्या एक्सलन्स शेल्टर्स या कंपनीचीही रेश्मा कामं करत होती. सकाळी साडे सहा ते साडे नऊपर्यंत स्वतःच्या कंपनीचे काम, पुढे १० ते ६ नोकरी आणि परत व्यवसाय, अशी त्यांची दिनचर्या असायची. इतक्या व्यस्त दिनचर्येत त्यांनी तीन वर्ष नोकरी केली. 
 
रेश्मा गर्वाने सांगतात, “या काळात माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याने मला खूप सपोर्ट केला. नवरा ही खंबीर मिळाला. सासू, सासरे हे सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. घरातील एक व्यक्ती काम करत असताना तिच्यामागे १० लोक काम करत असतात. घरातल्या साफ सफाई करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, केअर टेकर महिलेपासून सगळेच माझ्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मी फ्रंटला काम करत असताना मागे वळून बघितले तर बॅक स्टेजला खूप लोक काम करत असतात. त्यामुळे हे जे काही मी मिळवलं आहे ते मला एकटीला शक्य नव्हतं” 

 
त्या पुढे म्हणतात, “माझ्या कामावर माझ्या घरच्यांचा प्रचंड विश्वास आहे. मी सकाळी घरातून निघाले तर कधीकधी घरी पोहचायला रात्रच होते. या वेळेत कधीकधी घरी एक फोन करायलाही मला शक्य होत नाही. माझी अडचण घरचे समजून घेतात. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी एकमेकांच्या समजून घेण्यावर अवलंबून असतात.” 
 
अडचणींना कशा सामोरे गेल्या रेश्मा?   
व्यवसायाचा सुरुवातीचा काळ आठवत रेश्मा सांगतात, "टीममधील आम्हा पाचही जणांसाठी रिअल इस्टेट हे क्षेत्र पूर्णपणे नवीन होतं. हा कोणाचाही पिढीजात व्यवसाय नव्हता. आमची सगळ्यांचीच शैक्षणिक पार्श्वभूमी एकमेकांपासून भिन्न होती. एक जण फायनान्समध्ये होता, एक डॉक्टर, एक अँक्रोनीम्समध्ये तर, मी स्वत: इंजिनिअर. आणि आम्ही व्यवसाय सुरु केला तो रिअल इस्टेटमध्ये. त्यामुळे लोक म्हणायचे, ‘तुम्ही वर्ष दोन वर्षातच हे सगळ गुंडाळून घेऊन जाणार. हे तुमचं क्षेत्र नाहीये. इथे शंभर लोक टोप्या घालून निघून जातात त्यामुळे हे तुमच्याने हे होणार नाही.’

त्या पुढ सांगतात, "काही लोकांनी तर आव्हानच दिलं, 'दोन वर्षांनी बघू तुम्हाला कुठपर्यंत जाताय ते.' पण अशा प्रतिक्रियांना आपण नकारात्मकपणे घेत डिप्रेशनमध्ये जायचं की आव्हान त्या म्हणून स्वीकारायचं हे आपल्याच हातात असतं. आमच्यातली सकारात्मक उर्जा आम्ही टिकवून ठेवली आणि काम करत राहिलो. इंटर्नली आपण किती ग्रो होत आहोत हे आपल्याला स्वतःलाच माहित असतं. आपण इंटर्नली मजबूत असू तरच बाह्य आव्हाने पेलू शकू.”

त्यांनी निवडलेल्या क्षेत्राविषयी सांगताना त्या म्हणतात, “हे खूप अनऑर्गनाईज असंघटित क्षेत्रहोतं. बरेचदा लोकांकडून जमीन घेतल्यावर आम्हाला कळायचं की या जमिनीचे मालक तिघे भाऊ आहेत ते. त्यामुळे या क्षेत्रात घडी बसवणे फार अवघड आणि जिकीरीचे होऊन बसते. बाह्य आव्हाने स्वीकारताना अंतर्गतपणे एक व्यवस्था असणे त्यामुळे फार गरजेचे असते. हे ओळखून आम्ही ‘इनसाईड सिस्टीम’ विकसितकरण्यावर अधिक भर दिला.” 

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या  व्यवसायात पाय रोवण्याचे आव्हान
‘रियल इस्टेट’सारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात पाय रोवणे हे रेश्मा यांच्यासाठी आव्हानात्मकहोते. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. परंतु न डगमगता त्या आव्हानांना सामोरे जात होत्या. व्यवहार स्वच्छ असावा यासाठीही त्या आग्रही असायच्या. सुरुवातीला ग्राहक रोख पेमेंट करायचे. त्यामुळे रेश्मा आणि टीम त्यांना चेकने पेमेंट करण्याची विनंती करायचे. यामुळे त्यांनी अनेक श्रीमंत ग्राहक गमावले. 
 
दुसरा आव्हान जमिनीच्या कायदेशीरपणाचा होता. खरेदीदारांना नोंदणीचे महत्त्व आणि बिगरशेती भूखंड (NA Plot) खरेदीची कायदेशीर प्रक्रियाच माहित नसायची. त्यामुळे  ग्राहकांना आवश्यक कायदेशीर गोष्टींबद्दल साक्षर करण्याचे आव्हानही रेश्मा आणि त्यांच्या टीमला पेलावे लागले. 
 

 
कामातील हे अडथळे कमी करण्यासाठी त्यांनी दोन लीगल टीम तयार करून लँड अ‍ॅक्विजिशन सिस्टीम सेट केल्या. सोबतच इंटरनॅशनल मार्केटसाठीचे धोरणही निश्चित केले. याविषयी रेश्मा सांगतात, "टीमसाठीचे हे इनसाईड चॅलेंज होते. आउटसाईड चॅलेंजही अनेक होते. मात्र, लोक काय म्हणतील याने आम्हाला फरक पडत नव्हता. कारण आपण जर या क्षेत्रात यशस्वी झालो तर हेच लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील याची आम्हाला खात्री होती" 

सध्या रेश्मा कंपनीचा सेल्स आणि मार्केटिंग विभाग बघतात. त्याचबरोबर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केट, चॅनेल पार्टनर डेव्हलपमेंट या गोष्टीही त्या पाहतात. नवीन प्रोजेक्टचा त्या त्या भागानुसार मार्केट रिसर्च करून त्या भागातील टीम मजबूत करणे, चॅनेल पार्टनर किंवा मॅनडेट सेलिंग कंपनी घेऊन त्याचं मार्केट शोधून करून प्रोडक्ट मार्केटमध्ये पोहचवणे, हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग असतो. 
 
रिअल इस्टेट क्षेत्राबद्दल त्या सांगतात, "लोकांना या क्षेत्रात सल्ला देणाऱ्यांची गरज असते. जमीनीच्या बाबतीत लोकांच्या मनात प्रचंड गोंधळ आहे. ती गरज ओळखून त्यांच्या प्रश्नांची उत्तर देता आली तर या मार्केटमध्ये तुमची प्रचंड प्रगती होऊ शकते."  

रेश्मा सांगतात, "आम्ही लँड एज्युकेशनच्या म्हणजे जमिनीविषयी जनजागृतीच्या क्षेत्रात आहोत असे मी मानते. लोकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देणारं कंटेंट मी बनवते आणि लोकांपर्यंत पोहचवते. तसेच, याविषयीचे व्हिडीओ बनवते, वेबिनार घेते. यावर्षीचा एक लाख लोकांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांना जमीन घेण्यात मदत करण्याचाआमचा मानस आहे.”

त्या सांगतात, “सुरुवातीला प्रश्न पडायचा, आपण जे करतोय त्याचे पुढे काही भविष्य आहे की नाही? पण पुढे क्लायेंट वाढू लागले आणि असे प्रश्न पडायचे कमी झाले. जसे आईला बाळ झाल्यानंतर त्यांच्यासाठी तिने काहीतरी करायला हवं असं तिला वाटत. म्हणजे स्वतः व्यतिरिक्त ती दुसऱ्याबद्दल स्वतः पेक्षाही जास्त विचार करू लागते. अगदी तसचं क्लायेंट वाढल्यानंतर मलाही वाटायला लागलं की त्यांच्यासाठी मी काहीतरी करायला हवं. क्लायेंटसाठी नवीन प्रोडक्ट आणावे किंवा त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर त्याचा अभ्यास करावा. हे सगळं करण्याचा आनंद वेगळाच असतो.” 

व्यवसाय करताना कधी निराशेचा, हताशेचा प्रसंग आला होता का, असं विचारलं असता रेश्मा म्हणतात,  “तुमच्यात स्पष्टता असेल तर आयुष्यात येणारे निराश करणारे क्षण तात्पुरते वाटू लागतात. व्यवसाय म्हटलं की आर्थिक चढ उतार येतातंच. तुमच्या एखाद्या प्रोडक्टची मार्केटमधील मागणी अचानक कमी किंवा बंद  होऊ शकते. किवा नोटाबंदीसारखी एखादी गोष्ट होते आणि अचानक मार्केटच बदलून जातं. तर, कधी कोविडसारखी परिस्थिती येते. अशा वेळेस खचून जाणं किंवा त्या परिस्थितीचा स्वीकार करत त्याच्याशी दोन हात करणं  असे दोन पर्याय असतात. मी नेहमी दुसरा पर्याय निवडते.” 
 
आश्वासकपणे बोलणाऱ्या रेश्मा महिलांना प्रेरित करत सांगतात, "आपल्या आजीने व्यवसाय करायचा विचार केला असता तर तिला त्याकाळी ते शक्य नहोत. तिला पावलापावलांवर अडचणींना सामोरे जावं लागणार होत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आज महिलांच्या शिक्षणाला, नोकरी किंवा व्यवसाय करण्याला समाजाचा पाठींबासपोर्ट आहे.त्यामुळे महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी हा सोनेरी काळ आहे.”

कुटुंब आणि व्यवसाय यांमध्ये संतुलन साधताना कसरत करावी लागते का असं विचारल्यावर त्या म्हणतात, “कोविडमध्ये सगळी कामे गुगल आणि झूम मिटिंगवर होऊ लागली. आता लोकांना त्याची बऱ्यापैकी सवय झाली आहे. कोविडच्या तीन वर्षानंतरही ऑनलाईन मिटिंगच लोकांना सोयीस्कर वाटतात. मला अस वाटत ही बाब  महिलांच्या पत्थ्यावर पडणारी आहे. बाकीच्या वेळा सांभाळून त्या व्यवसाय सुरु करू शकतात. घरूनच मिटींग्स अटेंड करता येतात, वेळेची फ्लेग्झीबिलिटी आहे. त्यामुळे मला हवं तेव्हा मी माझ्या मुलांसाठी वेळ काढू शकते. इतर महत्वाची कामे असतील तर तेही करू शकते. त्यामुळे मला असं वाटत की  मुलांना सांभाळत व्यवसाय करण्याची ही उत्तम वेळ आहे."

तरुण-तरुणींना बिजनेस टीप देत त्या म्हणतात, "तरुणांनी आव्हाने स्वीकारायला हवीत. आज मार्केटमध्ये अनेक नवनवीन गोष्टी आलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. रेग्युलर इंजिनीअरिंग न करता तरुण एखादं स्पेशलायझेशन करू शकतात. जग सुपर स्पेशालिटीकडे चाललेलं असताना तुम्हीही स्वतःला टिपिकल करणे सोडायला हवं. स्वतःला बिल्ड अप करायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी आणि इतर स्किल विकसित करणे आज गरजेचं आहे. फक्त पठडीबद्ध शिक्षणात स्वतःला न अडकवता आणखी काही स्किल विकसित केले पाहिजेत. आताच्या स्पर्धेच्या वातावरणात स्वतःला सतत अपग्रेड करत राहण्याची गरज आहे."        

पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या ‘रियल इस्टेट’ सारख्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रेश्मा हाजिते यांनी  कितीतरी चौकटी मोडून काढल्या आहेत. त्यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी, विशेषतः महिलांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. ‘आपल्यालाही व्यवसाय करणे शक्य आहे’ हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार करणारा आहे.ते. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या रेश्मा यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यांत कायम तेज दिसतं. त्यांचे प्रचंड ज्ञान, आणिभविष्याविषयी स्पष्टता यांचा प्रत्यय येत जातो. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आपल्याही अंगात लहरत असल्याचा भास होतो. 
 
 
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार व सन्मान 
रेश्मा यांच्या पर्पल काउंटी प्रोजेक्टला ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. तसेच, रोटरी क्लबतर्फे दिला जाणारा 'मानिनी पुरस्कार', 'रयत गौरव पुरस्कार' आणि 'माऊली पुरस्कार’ आदी पुरस्कारांवरही त्यांनी आपले नाव कोरले आहे. 
 
- छाया काविरे

 

रेश्मा हाजिते यांच्याशी 'आवाज'च्या प्रतिनिधी छाया काविरे यांनी साधलेला संवाद

 

 


 
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या मुस्लीम महिला उद्योजिकांच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
 

शहनाज हुसेन... बस नाम ही काफी है!

 

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जद्दोजहद करणाऱ्या डॉ. अंजुम कादरी

 

मिरजची निलोफर झाली सेलिब्रिटी फॅशन डिझायनर


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube