मिरजची निलोफर झाली सेलिब्रिटी फॅशन डिझायनर

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
निलोफर यांनी तयार केलेल्या काही डिजाईन
निलोफर यांनी तयार केलेल्या काही डिजाईन

 

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. किंबहुना सर्वच क्षेत्रांमध्ये  त्यांनी पुरुषांपेक्षा आघाडी घेतल्याचे चित्र दिसते. एकेकाळी 'चूल आणि मूल' इतक्याच परिघात बंदिस्त असणाऱ्या महिला वर्गाने स्वतःच्या हिमतीवर हे बंधन जुगारून दिले आणि सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या व्यवसायविश्वातही महिलांनी नवनवीन क्षितिजे पादाक्रांत केली. त्यात मुस्लीम समाजातील महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अशाच मुस्लीम महिला उद्योजिकांची (woman entrepreneurs) यशोगाथा 'आवाज मराठी'वरून प्रसिद्ध होत आहे. त्यापैकीच एका कर्तृत्ववान उद्योजिकेची आणि तिच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख.
 
खेडेगाव आणि फॅशन हे समीकरण तसं लोकांच्या मनाला सहजासहजी पटत नाही.  खेड्यातील लोकांना फॅशन कळतच नाही या अविर्भावात शहरी लोक वावरत असतात. याच शहरी लोकांच्या विचारांना छेद देत एक खेडेगावातील साधी मुलगी काहीतरी जुजबी शिवणकामाचा कोर्स करते आणि तिच्या शहरातील ती टॉपची डिझायनर म्हणून नावलौकिक मिळवते. हे वाचायला जेवढ सहज वाटतं करायला ते तेवढच अवघड आहे.

खेड्यात आधीच संसाधनाची कमी असते. त्यातही समाजाचे भान ठेऊन, घरातील जबाबदाऱ्या सांभाळून सतत जिद्दीने तेच ते काम प्रत्येक वेळेस नाविन्याने करणं ही एक साधना आहे. आणि हीच साधना मागील १५ वर्षापासून नित्यनियमाने करणारी एक भक्त म्हणजे निलोफर मुलानी.

निलोफर मुलानी या सांगली जिल्ह्याच्या खानापूर या तालुक्यातील लेंगरे या गावातील रहिवासी आहेत. घरात शेतकरी आई-वडील, मोठा भाऊ आणि छोटी बहिण असे पाच जणांचे कुटुंब. सर्वसामान्य मुलींसारखं त्याचंही प्राथमिक मग माध्यमिक आणि शेवटी पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झालं. इंग्लिश या विषयात त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळी सुट्यांमध्ये ग्रामपंचायतीने एक शिवणकाम कोर्स सुरु केला होता. त्यांनी तीन-चार महिन्यांचा तो कोर्स करायचा निर्णय घेतला. या कोर्सच पुढे काय होईल? यात आपण कितपत करियर करू याबद्दल काहीही कल्पना नव्हती. तरीही त्यांनी हा कोर्स केला. 

पुढे काही महिन्यांनी त्यांच लग्न झाल. आयुष्यात भरारी घेण्याचं स्वप्न एका बाजूला तर लग्नानंतर येणारी घरची जबाबदारी दुसरीकडे. या दोन्ही तराजूच्या पारड्यात कशाला महत्व द्याव आणि काय सोडावं या कोड्यात असतानाच त्यांना मातृत्व लाभलं. त्यामुळे जबाबदारी वाढली होती पण जिद्द कमी झाली नव्हती.

या कसरती करत काहीतरी करायचंच ही खुणगाठ मनाशी बांधली. पण काय करायचं आणि कस या प्रश्नाने थांबवून ठेवलं होत. याआधी प्रोफेसर होण्याच्या स्वप्नाला तर पूर्णविराम मिळाला होता. मग दुसर काय? हा प्रश्न सतावत होता. त्यावेळेस त्यांची वाहिनी शमीमा पटेल यांनी त्यांना पाठबळ दिल. त्या निलोफर यांना एक गोष्ट आवर्जून सांगत ‘काहीही कर पण सुरुवात कर’. यातून निलोफर यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्या टेलरच्या दुकानात जाऊन काम घेत असत. १५ रुपयांमध्ये एक ब्लाउज शिवून देत. हे वाटत तितकं सोप्प नक्कीच नव्हत. कारण निलोफर म्हणतात कि “सासू, सासरे, नवरा हे सर्वच नोकरीला असताना मी १५ रुपयांसाठी काम करणं हे सुरुवातीला त्यांनाही ठीक वाटत नसे. सासू, सासरे हे शिक्षक आणि नवरा बँकेत कामाला असताना कशाला एवढा जीवाचा आटापिटा. पण मी न थांबता सलग दोन वर्ष हे काम चालूच ठेवले.

हे करत असताना हळूहळू त्यांनी स्वतःला विकसित करत बाहेरचे काम घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर हे काम  मोठ्या स्तरावर कसं न्यायचं याच्या प्रयत्नात त्या होत्या. त्याच दरम्यान त्यांची एक मैत्रीण अस्मिता गायकवाड हिने या सर्वाची जाहिरात करण्याचा सल्ला दिला. याचा परिणाम असा झाला की, सध्या निलोफर यांचे ‘इफ्रा बुटिक’ सांगलीतील प्रसिद्ध बुटिक आहे. इफ्रा म्हणजे क्रिएटीव. आणि त्या टॉपच्या फॅशन डिझाईनर म्हणून ओळखल्या जातात. एका वाक्यात त्यांच्या मेहनतीचे वर्णन करायचे झाल्यास एवढेच म्हणता येईल कि सतत १५ वर्षे जिद्दीने, चिकाटीने केलेली मेहनतीला फळ आले. आज निलोफर या ४१ वर्षाच्या आहेत.
 
१५ रुपयात एक ब्लाउज ते सांगलीतील प्रसिद्ध बुटिक या प्रवासातील काही अनुभव त्यांनी सांगितले. त्या म्हणतात, ‘शिवणकाम तर सर्वच करतात, मग मी वेगळ काय देऊ शकते यासाठी मी खूप आग्रही असते. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन विचार करणे हे नक्कीच सोपे नाही.’ ‘मोठमोठ्या शहरात हे शिकवण्यासाठी संस्था असतात. मात्र सांगली सारख्या ठिकाणी काहीतरी अडव्हांस लेवलच शिकण हेच एक मोठ आव्हान होत. त्यात माझं छोट मुल त्यामुळे तर बाहेर जाऊन शिकण शक्यच नव्हत. मग या शर्यतीत टिकून राहायचं असेल काय करावं लागेल तर मेहनत आणि ती घेण्यासाठी मी कसलीही कसूर सोडली नाही. मी रात्रंदिवस काम करत असे.’ सलग तीन वर्ष मी याच प्रयत्नात होते कि स्वतःला कसं घडवू, काय नवीन करता येईल. हे करत असताना मी स्वतःला टास्क द्यायचं आणि ते पूर्ण करायचे आणि यातून मी शिकत आणि घडत गेले. काहीतरी क्रिएटीव केल्याशिवाय झोपच येत नव्हती. शेवटी ३ वाजता उठून मी ते करायला घेत असत.’ आणि हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. 

एम ए पूर्ण झालेलं होतंच त्यात प्रोफेसर व्हायचं स्वप्न, हे सर्व सोडून शिवणकाम काम का करावंस वाटल या प्रश्नावर निलोफर यांनी अगदी सहजपणे उत्तर दिलं. त्या म्हणतात की, “मला घर सांभाळून काहीतरी क्रिएटीव करायचं होत आणि त्यासाठी हा मार्ग मला जास्त योग्य वाटला.” बाकी लोकांना हा व्यवसाय आणि याची व्याप्ती याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे सुरुवातीला सर्वांकडून नाराजीचा सूर उमटला होता. मात्र या नाराजीच्या सुरात एक सकारात्मक गोष्ट म्हणजे त्यांना हे काम करूच नको असं म्हणून कधीच कोणी रोखले नाही.हीच त्याच्या यशाची पहिली पायरी ठरली. एक-एक पायरी चढत आज त्या एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचल्या यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. त्याच्या हाताखाली आज काम करायला बायका आहेत. हे सर्व सांगताना त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती येत होती.

निलोफर यांच्या बोलण्यात एक आत्मविश्वास झळकत होता. त्यांनी एक विचार मांडला की, “आता तर मला कोणी पाठीमागे ओढू शकत नाही आणि मी तर बिलकुल जाऊ शकत नाही”.त्यांना त्यांच्या कामाबद्दल किती निष्ठा आणि प्रेम आहे शिवाय हे काम करण्यासाठी त्या किती खंबीर आहेत, याच एक उदाहरण म्हणजे मधल्या काळात निलोफर या पाच ते सहा वर्षे आजारी असतानाही त्यांनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले नाही किंवा त्यांनतर काम सोडले नाही. हीच त्याच्या चिकाटीची पोचपावती आहे.

या कामात येणाऱ्या अडचणींवर बोलत असताना निलोफर म्हणतात की, इथे रोजच्या अडचणी आहेत. प्रत्येक गोष्टीत एक नवे आव्हान आहे. फक्त ब्लाउज किंवा ड्रेस शिवणं वेगळ, पण मी इथे एक फॅशन डिझाईनर म्हणून काम करते. हे काम बाकी कामांपेक्षा पूर्ण वेगळं आहे. हे सर्व करताना मन शांत आणि एकाग्र पाहिजे.” मानसिकदृष्ट्या खंबीर राहणं हेच एक मोठं आव्हान असतं. कारण कुटुंबासाठी वेळ देताना अशी शांत आणि एकाग्रता शोधणे हेच एक मोठे आव्हान होते. त्यावेळी सर्व झोपल्यावर जागरण करून मी माझे काम पूर्ण करायचे. 

या १५ वर्षाच्या काळात काय मिळवलं याच उत्तर देताना त्या प्रचंड आत्मविश्वासी जाणवत होत्या.या क्षेत्रातील इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर त्या एकच म्हणतात ‘आज मला काहीही द्या मी करू शकते. मी स्वतःला मिळवलं याचा मला अभिमान आहे.’ हे समाधान त्याच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवत होतं. आज मी स्वतःला मिळवलं या मागचं तर्क त्यांनी सांगितलं माझ्या बरोबर शिकणाऱ्या मुली उच्च शिक्षण घेऊनही आर्थिक दृष्ट्या परावलंबी आहेत याउलट मी काही तरी कमाऊ शकले ही गोष्ट खूप मोठी आहे. कारण यातून आपली होणारी वाढ आणि त्यातून मिळणारे मानसिक समाधान याच एक वेगळं महत्व आहे.

कामातून वेळ मिळतो का असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्याच्या उत्तरातून त्याचं कामाप्रतीचे प्रेम दिसून येते. त्या म्हणतात “मला कामातून वेळ नकोच कारण माझं काम हाच माझा वेळ आहे. स्वतःला झोकून देऊन काम करणं यातच मला आनंद मिळतो. माझ्यातील या गुण वैशिष्ट्यामुळे मराठी सीरिअलच्या बऱ्याच अभिनेत्रींच्या ड्रेसचे डिझाईनचे कामही मिळाले."

एका स्त्रीला जीवनात यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं असते याबद्दल बोलताना त्या म्हणतात. स्त्रियांना यशस्वी व्हायचं असेल तर कोणी मदत करेल याची वाट न बघता स्वतःच स्वतःला पुढे ढकलले पाहिजे. सोबतच स्वतःला वयाच्या बंधनात न अडकवता कोणत्याही वयात शिकलं पाहिजे. दुसऱ्याला दोष न देता तिला स्वतःला काय करायचे याविषयी तिच्या मनात स्पष्टता पाहिजे. मुस्लिम समाजात प्रचलीत असणाऱ्या परदा पद्धतीला छेद न देताही स्वप्न पाहता येतात आणि ते सत्यात उतरवता येतात असा संदेशही त्यांनी मुस्लिम समाजातील महिलांना दिला. मुख्य म्हणजे महिलांनी शिक्षण घेण्यासाठी त्या आग्रही होत्या. काहीही करा पण स्वावलंबी बना हे तत्व पाळले पाहिजे असा संदेश ही त्यांनी आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून दिला.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या मुस्लीम महिला उद्योजिकांच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
 

शहनाज हुसेन... बस नाम ही काफी है!

 

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जद्दोजहद करणाऱ्या डॉ. अंजुम कादरी

 

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रियल इस्टेटमध्ये स्वतःची 'जागा' निर्माण करणाऱ्या रेश्मा हाजिते

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube