भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारत आणि अमेरिकेतील संरक्षण व धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दहा वर्षांची रूपरेषा निश्चित करण्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी सहमती दर्शवली आहे. दोघांमध्ये दूरध्वनीद्वारे संवाद झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रातील आगामी रूपरेषेबाबत 'पेंटॅगॉन'च्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काय म्हटले आहे? 
राजनाथ सिंह आणि पीट हेगसेथ यांनी संरक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन सहकार्यावर चर्चा केली. या सहकार्यामध्ये प्रशिक्षण आणि लष्करी उत्पादनांची देवाणघेवाण यांचा समावेश होता. संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावरही विस्तृत चर्चा झाली.\

'हेगसेथ आणि राजनाथ सिंह यांच्यात या वर्षी जेव्हा पुढील भेट होईल, तेव्हा पुढील दहा वर्षांसाठीचा अमेरिका भारत संरक्षण रूपरेषा करारावर स्वाक्षरी करण्यावर सहमती झाली आहे,' असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दोन्ही देशांनी भारताकडील प्रलंबित संरक्षण उत्पादनांची विक्री, दोन्ही देशांमधील सखोल संरक्षण औद्योगिक सहकार्य आदी मुद्द्यांवर चर्चा केली. दक्षिण आशियामधील भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे, असे हेगसेथ यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीदरम्यान निश्चित केलेल्या संरक्षण उद्दिष्टांबाबत केलेल्या लक्षणीय प्रगतीचा आढावा घेतला. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील सहकार्याचा मुद्दा यावेळी चर्चेत आला. अमेरिका भारतातील दोन प्रमुख संरक्षण विक्री व्यवहारांबाबत संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा झाली, असे अमेरिकेच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मंगळवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणात, राजनाथ यांनी हेगसेथ यांना तेजस विमानांसाठी आवश्यक असलेल्या 'जीई-एफ ४०४' इंजिनाच्या वितरणास गती देण्याचे आवाहन केले. सिंह यांनी 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' आणि अमेरिकन संरक्षण क्षेत्रातील प्रमुख कंपनी 'जीई एअरोस्पेस' यांच्यात भारतात 'एफ-४१४' जेट इंजिन्सच्या संयुक्त निर्मितीसाठी प्रस्तावित कराराच्या अंतिम रूपावरही भर दिला, असेही सूत्रांनी सांगितले.