पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) येथे एका विशेष चर्चासत्रावेळी अधिकारी व अभियंते
"गेल्या दहा वर्षांपासून देशात नैसर्गिक आपत्तींची संख्या आणि तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता पूर, चक्रीवादळे, भूकंप आणि भूस्खलन या केवळ कधीतरी घडणाऱ्या घटना राहिलेल्या नाहीत, तर त्या वारंवार घडणाऱ्या, देशावर विपरीत परिणाम घडवणाऱ्या समस्या बनल्या आहेत. या आपत्तींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरच गंभीर परिणाम होत आहे. आर्थिक व्यवहार ठप्प पडतात, पायाभूत सुविधांचा नाश होतो. राज्य, जिल्हा प्रशासनावरही प्रचंड ताण येतो," असे प्रतिपादन दक्षिणी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केले.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) येथे 'एक्झरसाईज दुर्ग विश्वास : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातील अभियांत्रिकी दलाची भूमिका : धोका, तयारी आणि मदतकार्य' एका विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त), एनडीएमएचे विभागप्रमुख राजेंद्र सिंग, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (निवृत्त), इंजिनिअर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पीयूष आनंद आदी उपस्थित होते.
लेफ्टनंट जनरल सेठ म्हणाले, "आसाममधील भीषण पूर, हिमाचल प्रदेश आणि वायनाडमधील भूस्खलन, उत्तराखंडमधील ढगफुटी आणि किनारपट्टीवरील वारंवार येणारी चक्रीवादळे ही या वाढत्या संकटाची काही प्रमुख उदाहरणे आहेत. गेल्यावर्षी देशाला नैसर्गिक आपत्तींमुळे १२ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक नुकसान झाले, जे मागील दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त खूप आहे." तसेच, देशभरातील विस्तीर्ण विस्तारामुळे भारतीय लष्कर अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत पहिले प्रतिसादक म्हणून समोर येते. विशेषतः जेव्हा नागरी प्रशासनाची क्षमता अपुरी पडते. वायनाडमध्ये अवघ्या ४८ तासांत १३० फुटांचा बेली ब्रिज उभारण्याचे काम असो किंवा अहमदाबाद विमान अपघातात तत्काळ बचावकार्य असो, लष्करी अभियंत्यांनी नेहमीच त्यांची तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिकता सिद्ध केल्याचे सेठ म्हणाले.
आनंद म्हणाले की, भूकंप, भूस्खलन या दोन आपत्तींबाबत अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. सध्या संपूर्ण जगात भूकंप, भूस्खलनाचा अचूक अंदाज लावणारी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही. त्यामुळे या आपत्तींपासून वाचण्यासाठी आपल्याला नेहमी सज्ज राहावे लागेल.
पुण्यात सुरू झाले नागरी प्रशिक्षण केंद्र
आपत्ती व्यवस्थापन ही केवळ सरकारी यंत्रणांची जबाबदारी नाही, तर बहुतांश वेळा नागरिकांकडूनही प्रतिसाद दिला जातो. त्यामुळे लष्कर आणि समाज यांच्यात संस्थात्मक समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने दक्षिण मुख्यालयाने पुण्यात लष्कर, नागरी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्याद्वारे प्रशिक्षण, उपक्रम आयोजित केले जातील. या केंद्राच्या यशानंतर दक्षिण मुख्यालयाच्या अन्य तळांवरही अशी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह नुकत्याच झालेल्या चर्चेतही आपत्ती निवारण हा महत्त्वाचा मुद्दा होता. याप्रमाणेच अन्य अकरा मुख्यमंत्र्यांशीही याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे लेफ्टनंट जनरल सेठ यांनी सांगितले.