वर्षपूर्ती बांगलादेशातील अस्थिरतेची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या ढाक्यातील पॅलेसला विद्यार्थ्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी घातलेला वेढा
तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या ढाक्यातील पॅलेसला विद्यार्थ्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी घातलेला वेढा

 

पाच ऑगस्ट २०२४ च्या दिवशी ढाक्यातील अब्दुर रेहमान तारीफ हे बहिण मेहरुन्निसा यांच्याशी फोनवरून बोलत होते. त्याचवेळी अचानक समोरून येणारा आवाज बंद झाला. काहीतरी वाईट घडलंय, याची जाणीव झाली. त्यामुळे ते रस्त्यावर सुरक्षा दल आणि आंदोलक यांच्यात गोळीबार सुरू असताना बहिणीकडे पळाले. घरी पोचले तेव्हा त्यांची आई वडील रक्ताने माखलेल्या बहिणीला दवाखान्यात नेण्यासाठी धडपड करत होते. काळजाचा ठोका चुकविणान्या या घटनेला एक वर्ष पूर्ण होतेय. पण तारीफ यांच्या आयुष्यातील हा प्रसंग कधी न विसरणारा होता. 

तारीफ म्हणतात, मेहरुन्निसा ही खोलीच्या खिडकीजवळ उभी होती आणि तेव्हाच एक बेछूट गोळी तिच्या छातीला लागली. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. २३ वर्षीय मेहरुन्निसाची गेल्यावर्षी पाच ऑगस्ट रोजी हत्या करण्यात आली. त्याचदिवशी विद्यार्थ्यांच्या बंडामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशातून परागंदा व्हावे लागले. या गच्छंतीमुळे त्यांची पंधरा वर्षाची देशातील राजवट अस्तंगत झाली. 

दरम्यानच्या काळात बांगलादेशला सरकारविरोधातील आंदोलनाची प्रचंड किंमत मोजावी लागली. आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्यात बहुतांश विद्यार्थी सहभागी झाले होते. संतप्त आंदोलकांनी पोलिस ठाणे आणि सरकारी इमारतींची जाळपोळ केली. अनेक बांगलादेशी नागरिकांप्रमाणेच तारीफ आणि त्यांच्या बहिणीने देखील राजकीय बदलाच्या अपेक्षेने बंडात सहभाग घेतला. त्यांच्या चुलत बंधूंची सुरक्षा दलाने गोळी झाडून हत्या केली तेव्हा हे भावंड सरकारविरोधात मैदानात उतरली होती. बीस वर्षीय तारीफ म्हणाले, आम्ही घरी राहू शकत नव्हतो आणि शेख हसीना यांनी सत्ता सोडावी अशी इच्छा होती. आम्हाला कोणताही भेदभाव नसणारा आणि अन्याय नसणारा देश हवा. आज मात्र अपेक्षाभंग झाला आहे. आम्हाला व्यापक बदल हवा होता, परंतु आम्ही आता निराश झालो आहोत, असे तारीफ म्हणतात.

सत्ता सांभाळल्यानंतर महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने देशात सुधारणा आयोगांची नियुक्ती केली आणि यात राष्ट्रीय सार्वमत आयोगाचा समावेश आहे. हा आयोग सरकार स्थापन आणि निवडणूक प्रक्रियेसाठी राजकीय पक्षांसाठी काम करतो. मात्र राजकीय पक्षातील वैचारिक संघर्ष पाहता निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यास हंगामी सरकारला अपयश आले. हिंसाचार, पक्षांतील संघर्ष, धार्मिक कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले, अल्पसंख्याक समूहाबद्धलचा वाढलेला द्वेष पाहता नजीकच्या काळात लोकशाही स्थापनेची शक्यता पुसट झाली. मानवी हक्क संघटनेच्या मते, हसीना यांच्या राजवटीच्या काळात विरोधकांच्या मनात असणारी भिती आणि दमनकारी प्रवृत्ती तसेच अपहरणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. हसीना यांच्या अवामी लोग पक्षावर निर्बंध असून या संघटनेच्या मते, गेल्या वर्षभरात दोन डझनपेक्षा अधिक समर्थक मारले गेले आहेत.

मानवी हक्क संघटनेने ३० जुलै रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, हंगामी सरकार आव्हानात्मक असणारा मानवाधिकाराचा अजेंडा देशात लागू, करण्यास अपयशी ठरले आहे.

सुरक्षित बांगलादेश हवा 
गेल्या वर्षी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या मेहरुन्निसा यांचे वडील मुशर्रफ हुसेन म्हणाले, मागच्या वर्षीचे बंड केवळ सरकार बदलण्यासाठी नव्हते तर असंतोष होता. आम्हाला एक नवीन बांगलादेश हवा आहे. स्वातंत्र्यानंतर ५४ वर्षे झाली असून, अजूनही पारतंत्र्यात असल्याचा भास होतो. मेहरुन्निसा यांचा भाऊ तारीफ यांनी वडिलांच्या मताला दुजोरा देत सांगितले की, सध्याच्या देशातील स्थितीवरून आपण समाधानी नाहीत. मला सुरक्षित बांगलादेश हवा असून, कायदेशीर संस्था योग्य रितीने काम करत असतील, अशा स्वरूपाचे राज्य हवे. कोणतेही सरकार आले तरी पूर्वीसारख्या जबरदस्ती करणारे, अपहरण करणारे आणि हत्येचा आधार घेणारे नसावे.