"दहशतवाद्यांना आश्रय देण्यापासून आणि आपल्याच लोकांवर बॉम्बहल्ले करण्यापासून वेळ मिळाल्यास, पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था सुधारण्यावर आणि मानवाधिकारांची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे," अशा कठोर शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानला सुनावले आहे.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ६०व्या नियमित सत्रात बोलताना जिनिव्हा येथील भारताच्या स्थायी मिशनमधील कौन्सुलर क्षितिज त्यागी यांनी, पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा (PoK) उल्लेख करत, पाकिस्तानला "आपल्या बेकायदेशीर ताब्यातील भारतीय भूभाग" रिकामा करण्यासही सांगितले.
भारताविरोधातील अपप्रचारावर घेतला आक्षेप
त्यागी यांनी UN च्या व्यासपीठाचा भारताविरोधात निराधार आणि चिथावणीखोर विधानांसाठी गैरवापर केल्याबद्दल पाकिस्तानी शिष्टमंडळावर जोरदार टीका केली.
क्षितिज त्यागी म्हणाले, "आमच्या भूभागावर डोळा ठेवण्याऐवजी, त्यांनी आपल्या बेकायदेशीर ताब्यातील भारतीय भूभाग रिकामा केला तर बरे होईल."
खैबर पख्तुनख्वामधील घटनेचा थेट उल्लेख न करता क्षितिज त्यागी म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवाद निर्यात करणे, संयुक्त राष्ट्राने प्रतिबंधित केलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि आपल्याच लोकांवर बॉम्बफेक करणे यातून वेळ मिळाल्यास आपली अर्थव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे.