राज्य शासनाकडून विश्वविजेत्या त्रिकुटाचा सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
महिला विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसमवेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
महिला विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसमवेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

 

मुंबई

"तुम्ही 'महाराष्ट्राचा अभिमान' आहात," अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गौरव केला. भारतीय संघाने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या तिघींनाही प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचे धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबईत आयोजित या सत्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले की, "भारतीय महिला संघाने प्रथमच विश्वचषक जिंकून जो ठसा उमटवला आहे, तो ऐतिहासिक आहे. तुम्ही महाराष्ट्राची मान उंचावली आहे."

"भारतीय महिला क्रिकेट संघ हा कुटुंबासारखा आहे. ज्यावेळेस खेळाडू हे एकमेकांना साथ देतात, तेव्हाच तो संघ जिंकतो आणि यामुळेच भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषक जिंकला आहे. महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंनी संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केली असून, जेमिमाने उपांत्य फेरीत लगावलेल्या शतकामुळे आपण अंतिम फेरीत दाखल झालो. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला क्रिकेटला एक चांगला दर्जा मिळवून दिला आहे", अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे देखील आभार मानले.

 

महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या सर्व खेळाडूंचा राज्याला सार्थ अभिमान आहे आणि भविष्यातही खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयाची तुलना १९८३ च्या कपिल देव यांच्या विश्वविजयाशी केली. ते म्हणाले, "१९८३ च्या विश्वविजयाप्रमाणेच, महिला खेळाडूंचा हा विजयही तितकाच महत्त्वाचा आणि देशासाठी अभिमानास्पद आहे."

 

या सन्मानाने भारावलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "पुढच्या पिढीसाठी जात-पात याला बाजूला सारून हा खेळ खेळणे आणि आई-वडिलांची सेवा करणे, हेच आनंदी महाराष्ट्रासाठी सर्वस्व आहे."

या सोहळ्याला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार, महिला धावपटू ललिता साळुंखे आणि माजी हॉकीपटू रेखाताई यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.