"पाकिस्तानचा इतिहास अवैध अणुकार्यक्रमाचाच"; भारताने घेतला ट्रम्प यांच्या वक्तव्याचा समाचार

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जैस्वाल
परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जैस्वाल

 

नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि चीनच्या प्रगतीला प्रत्युत्तर म्हणून अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या घोषणेदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या अवैध अणु हालचालीबद्दलही उल्लेख केला.

यावर भारताने अत्यंत सावध पण तितकीच सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या 'अवैध' अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले वक्तव्य हे "पाकिस्तानच्या (तशा) इतिहासाला धरूनच आहे."

गुरुवारी, परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांना याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, "आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्याची नोंद घेतली आहे. पाकिस्तानचा बेकायदेशीर अणुप्रसार आणि प्रादेशिक सुरक्षेवर होणारा त्याचा परिणाम, याबद्दल भारताने नेहमीच गंभीर चिंता व्यक्त केली आहे."

जैस्वाल पुढे म्हणाले, "पाकिस्तानचा या संदर्भातील पूर्वेतिहास सर्वांनाच माहित आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या सर्व घडामोडींवर आमचे बारकाईने लक्ष आहे आणि आम्ही आमच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास कटिबद्ध आहोत."

ट्रम्प यांनी अणुचाचण्या सुरू करण्याची घोषणा करताना रशिया आणि चीनचा मुख्यत्वे उल्लेख केला असला, तरी त्यात पाकिस्तानच्या 'अवैध' अणुकार्यक्रमाचा संदर्भ आल्याने, भारताने या संधीचा उपयोग पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर पुन्हा एकदा जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी केला आहे.