डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
चार्ली किर्क
चार्ली किर्क

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि तरुण रूढीवादी नेते चार्ली किर्क यांची यूटा येथील एका विद्यापीठात भाषण देताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अधिकाऱ्यांनी या घटनेला राजकीय हत्या म्हटले आहे.

गुरुवारी अल जजीराच्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय चार्ली किर्क यांची हत्या ही सुनियोजित राजकीय घटना मानली जात आहे. किर्क हे रूढीवादी तरुणांचे संघटन असलेल्या टर्निंग पॉइंट यूएसएचे सहसंस्थापक होते. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर किर्क यांच्या निधनाची पुष्टी करत लिहिले की, महान आणि थोर चार्ली किर्क आता आपल्यात नाहीत. अमेरिकेतील तरुणांचे मन त्यांनी खूप चांगले जाणले. सर्वांना, विशेषतः मला, त्यांच्यावर खूप प्रेम होते. ट्रम्प यांनी किर्क यांच्या स्मरणार्थ रविवारपर्यंत अमेरिकेत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविण्याची घोषणा केली.

यूटा व्हॅली विद्यापीठात भाषण देताना किर्क यांना गोळ्या घालण्यात आल्या. प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू आला आणि किर्क तात्काळ खुर्चीवरून खाली कोसळले. विद्यार्थी घाबरून पळू लागले. यूटाचे गव्हर्नर स्पेंसर कॉक्स यांनी ही घटना राजकीय हत्या असल्याचे सांगितले आणि हा दिवस राज्य आणि देशासाठी दुखद आहे, असे म्हटले.

घटनेवेळी किर्क प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांना गोळी लागली आणि ते जमिनीवर कोसळले. यूटा लोक सुरक्षा विभागाचे आयुक्त बो मेसन यांनी सांगितले की, काळे कपडे घातलेल्या संशयिताने कदाचित छतावरून गोळी झाडली. सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी सांगितले की, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते, पण चौकशी नंतर त्याला सोडण्यात आले. तपास सुरू आहे आणि माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाईल. अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये किर्क यांना तरुण रूढीवादी गटांमध्ये रॉक स्टार म्हणून ओळखले जायचे. ट्रम्प यांच्या पुनर्निवडणूक मोहिमेत समर्थन मिळवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॉलेज परिसरातील त्यांच्या कार्यक्रमांना हजारो लोक उपस्थित राहायचे.

माजी रिपब्लिकन खासदार जेसन चॅफेट्झ यांनी सांगितले की, त्यांनी गोळ्यांचा आवाज ऐकला आणि किर्क अचानक मागे कोसळताना दिसले. कार्यक्रमात पोलिसांची उपस्थिती खूपच कमी होती.अल जजीराच्या मते, ही हत्या अमेरिकेतील अलीकडील राजकीय हिंसाचाराच्या मालिकेतील ताजी घटना आहे. गेल्या वर्षी ट्रम्प यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाला होता आणि यावर्षी जूनमध्ये एका डेमोक्रॅटिक खासदार आणि त्यांच्या पतीची हत्या झाली होती.