गाझामधील युद्ध संपवून कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आज (सोमवार) होणाऱ्या महत्त्वपूर्ण जागतिक शांतता परिषदेसाठी भारताला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहणार नसून, त्यांच्या जागी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह हे त्यांचे 'विशेष दूत' म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करतील.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना शनिवारी ऐनवेळी निमंत्रण मिळाले. मात्र, वेळेच्या अभावी पंतप्रधान मोदी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह रविवारी रात्रीच कैरोमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी 'X' वरून माहिती देताना म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून शर्म अल-शेख येथील गाझा शांतता परिषदेत सहभागी होण्यासाठी मी कैरोच्या ऐतिहासिक शहरात दाखल झालो आहे."
या परिषदेत २० हून अधिक देशांचे नेते सहभागी होणार असून, यात ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचाही समावेश आहे.
या परिषदेत भारताची उपस्थिती मध्य-पूर्वेतील शांततेसाठी आणि पॅलेस्टिनी नागरिकांप्रति भारताची असलेली सद्भावना दर्शवते. यातून इजिप्तसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची संधीही भारताला मिळणार आहे.