पाकिस्तानच्या हेरांना एनआयएचा दणका: ८ राज्यांत १५ ठिकाणी छापे!

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 2 d ago
NIA
NIA

 

 नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हेरगिरी रॅकेटला चक्रावून टाकणारी कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी ३१ मे २०२५ रोजी केली. देशभरातील ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी छापे टाकून एनआयएने मोठा दणका दिला. दिल्ली, महाराष्ट्र (मुंबई), हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगालमधील संशयितांच्या घरांवर ही कारवाई झाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला हेरगिरीसाठी अटक झाल्याच्या काही दिवसांतच हे छापे टाकण्यात आले.

 

एनआयएच्या पथकांनी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संवेदनशील आर्थिक कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची सामग्री जप्त केली. ही सामग्री पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणांशी (पीआयओ) जोडलेल्या हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासली जात आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, हे रॅकेट भारताविरुद्ध दहशतवादी कट रचण्यासाठी कार्यरत होतं.

 

 

या प्रकरणाचा तपास २० मे रोजी नोंदवण्यात आला, जेव्हा सीआरपीएफचा निलंबित सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) मोती राम जाट याला अटक झाली. जाट २०२३ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती पुरवत होता आणि त्याला भारतातील विविध मार्गांनी पैसे मिळत होते. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती गळती केल्याने त्याला सीआरपीएफमधून बडतर्फ करण्यात आलं.

एनआयएने या प्रकरणात भारतीय दंड संहिता, अधिकृत गुप्तता कायदा आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली तपास सुरू ठेवला आहे. संशयितांचे पाकिस्तानी गुप्तचरांशी संबंध आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास आता अधिक गडद होत आहे.