आपल्याला मिळत असलेले महत्त्व दुसऱ्याच्या राजकारणाचा भाग आहे, याचे भान न ठेवता पाकिस्तानी लष्करप्रमुख आपल्या बेटकुळ्या फुगवून दाखविण्याचे प्रयोग करू लागले आहेत.
सध्याच्या अनिश्चित अशा जागतिक परिस्थितीत एखाद्या आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेल्या देशाच्या लष्करप्रमुखाने भारताला अण्वस्त्रांची धमकी देणे, एवढेच नव्हे तर अर्धे जग नष्ट करण्याची भाषा करणे, हे रोगट मानसिकतेचे लक्षण म्हणावे लागेल.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना असे बोलण्याची खुमखुमी येण्यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचे दुटप्पी आणि धूर्त राजकारण. ते अनेक वर्षे चालत आले आहे; परंतु अलीकडच्या काळात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिष्टाचाराची, सभ्यतेची उरलीसुरली आवरणेही टराटर फाडायला सुरुवात करून जणू `प्रतिक्षिप्त क्रिये’लाच आपले परराष्ट्रधोरण बनवले आहे.
व्यापाराच्या बाबतीत, विशेषतः रशियाकडून खनिजतेल खरेदी करण्याच्या मुद्यावर भारत आपल्या तालावर नाचायला तयार नाही, हे पाहताच पाकिस्तानला चुचकारायला त्यांनी सुरुवात केली. तेल उत्खननासाठी आपण पाकिस्तानला मदत करू, असे सांगून ट्रम्प मोकळे झाले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना स्वागताच्या पायघड्या अंथरल्या.
तिथे या महाशयांनी जी काही मुक्ताफळे उधळली, ती ऐकल्यानंतर ट्रम्प यांचे सवंग राजकारण कशाकशाला खतपाणी घालते आहे, याची विदारक जाणीव होते. अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे एक माजी अधिकारी आणि पश्चिम आशियाचे अभ्यासक मायकेल रुबीन यांनी या मुनीर यांना ‘सुटाबुटातले ओसामा बिन लादेन’ असे म्हणून अमेरिकी राज्यकर्त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
तो गांभीर्याने घेतला नाही तर हा आगीशी खेळ महागात पडू शकेल. भारताने तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त करताना अण्वस्त्रांचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करण्याची पाकिस्तानची जुनीच खोड असून हे अत्यंत बेजबाबदार वर्तन असल्याची दखल जागतिक समुदायाने घ्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाकिस्तानला कडेवर घेण्याचे अमेरिकेचे धोरण आजचे नाही.
भारत व पाकिस्तानला एकाच मापदंडाने मोजणे, मानवी हक्कांच्या प्रश्नाकडे ‘निवडक’पणे पाहणे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे सल्ले भारताला देणे असे अनेक प्रकार अमेरिकेने केले आहेत. भारताचे सहकार्य हवे असेल तेव्हा मात्र ‘दोन मोठे लोकशाही देश’ असल्याचे गहिवर काढायचे, ही त्या देशाची रीत. त्यात किती दांभिकपणा भरला आहे, हे उघडच दिसते आहे.
पाकिस्तानातील मुलकी सरकारच्या प्रमुखाला प्रतिष्ठा न देता ती थेट लष्करप्रमुखाला द्यायची, त्याचे प्रस्थ वाढवून, त्याच्या वर्चस्वाला एक प्रकारची अधिमान्यता मिळवून द्यायची, हे ‘लोकशाहीप्रेमी’ म्हणवणाऱ्या अमेरिकेला शोभते का, हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र अशा प्रश्नांना उत्तरे देण्याची गरजही ट्रम्प यांच्यासारख्या नेतृत्वाला वाटत नाही.
खरेतर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याने त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात, हे अमेरिकेने ९-११ च्या निमित्ताने अनुभवले आहे. पण त्यापासून काही धडा घ्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले दिसते. आताही ट्रम्प जुना खेळ नव्याने खेळू पाहत आहेत.
‘बलुच लिबरेशन आर्मी’ला चक्क दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून अमेरिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताने परिस्थितीची गरज ओळखून चीनशी सहकार्य वाढविण्याबाबत सुरू केलेला विचार आणि भारत, रशिया, चीन हा नवा संभाव्य त्रिकोण आपल्याला डोईजड होईल, हे ओळखून भारताला पाकिस्तानबरोबरच्या कुरबुरींमध्ये अडकवून ठेवण्याचा ट्रम्प यांचा डाव दिसतो.
भारत आपल्या मनाप्रमाणे व्यापारी तडजोडी करत नसल्याचे दिसून आल्यानंतर ‘व्हाइट हाउस’ने पाकिस्तानी लष्करप्रमुखाला जाळ्यात ओढले. पण आपल्याला मिळत असलेले महत्त्व कोणत्या तरी राजकारणाचा भाग म्हणून आहे, हे वास्तव न ओळखता हे असीम मुनीर आपल्या बेटकुळ्या फुगवून दाखविण्याचे प्रयोग करू लागले आहेत.
आता तर त्यांनी दहशतवाद्यांच्या तोंडी शोभेल अशी धमकीची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. अर्थात या आण्विक धमक्यांना घाबरण्याचे काही कारण नसले तरी अण्वस्त्रांच्या मुद्यावर इतक्या सवंगपणे बोलणे हेदेखील अत्यंत धोकादायक मानायला हवे. जगाने खरे तर यांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.
अर्थात यात अन्य कोणत्याही देशांपेक्षा संयुक्त राष्ट्रे आणि ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थे’सारख्या संस्थांची भूमिका ही अधिक महत्त्वाची असेल. याशिवाय पाकिस्तानी अण्वस्त्रे ही अन्य कोणत्याही दहशतवादी गटांच्या हाती लागू नयेत म्हणून देखील भारताला योग्य ती काळजी घ्यावी लागेल. भारताचे परराष्ट्रधोरण हे नेहेमीच सक्रिय आणि ठोस उद्दिष्टे व दिशा असलेले राहिले आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्या शक्तीचे ‘साधन’ बनण्यास ठाम नकार देणारे ते धोरण आहे. पाकिस्तान मात्र महासत्तेच्या हातातील ‘प्यादे’ म्हणून राहण्यात रममाण आहे. त्या बळावर भारताला आण्विक धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. हे डावपेच हाणून पाडणे,स्वसामर्थ्य वाढवत राहणे आणि राजनैतिक संबंधांतही आत्मनिर्भरता टिकवणे ही बाब आता भारतासाठी महत्त्वाची आहे.