पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार संघाच्या शताब्दी सोहळ्याचा शुभारंभ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशन

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त उद्या (ता. १ ऑक्टोबर) होणाऱ्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यानिमित्त संघाची वाटचाल दर्शविणारे विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या ऐक्यातील
भूमिका अधोरेखित केली जाणार आहे. 

पंतप्रधान कार्यालयातर्फे यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात उद्या सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम होईल. त्यात पंतप्रधान राष्ट्रासाठी 'आरएसएस'च्या योगदानावर प्रकाश टाकणारे विशेषत्वाने तयार केलेले स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करतील. यावेळी पंतप्रधानांचे सभेला संबोधितही करतील. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे याप्रसंगी उपस्थित राहतील. १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती, सांस्कृतिक जागरूकता, शिस्त, सेवा आणि सामाजिक जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने स्वयंसेवक आधारित संघटना म्हणून संघाची स्थापना झाली होती.

मागील शतकात, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आणि आपत्ती निवारणात संघ स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पूर, भूकंप आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये संघ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संलग्न संघटनांनी युवक, महिला आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी, सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना बळकटी देण्यासाठी योगदान दिले आहे.

शताब्दी उत्सव केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक प्रवासात आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशात त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय पुनर्बाधणीसाठीची अद्वितीय लोक-संवर्धन चळवळ आहे. शतकानुशतके परकीय राजवटीला प्रतिकार म्हणून संघाचा उदय पाहिला गेला आहे.

ऑगस्टमध्ये झाली व्याख्यानमाला
२६ ते २८ ऑगस्ट या कालावधीत संघ शताब्दीनिमित्त संघाविषयीची माहिती देणारी व्याख्यानमाला झाली होती. तीन दिवस चाललेल्या याकार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या कार्यपद्धतीबद्दल व्याख्यान दिले होते. तसेच संघाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली होती. आता विजयादशमीपासून (२ ऑक्टोबर) पुढील विजयादशमीपर्यंत संघातर्फे शताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.