फरिदाबादहून आणलेली स्फोटके पोलीस स्टेशनमध्येच फुटली! ९ ठार, २४ पोलीस जखमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

श्रीनगरच्या हद्दीबाहेरील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका शक्तिशाली 'अपघाती' स्फोटात नऊ जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा स्फोट पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरिदाबाद येथून जप्त केलेली स्फोटके तपासत असताना झाला. हा साठा अटक केलेल्या डॉक्टरच्या प्रकरणातील २,९०० किलो रासायनिक साठ्याचा भाग होता. या स्फोटामुळे एकामागोमाग एक लहान स्फोट झाले आणि पोलीस स्टेशनच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले.

या दुर्घटनेत किमान २७ जण जखमी झाले आहेत. यात २४ पोलीस कर्मचारी आणि तीन नागरिकांचा समावेश आहे. अनेकांना भाजल्याच्या जखमा आणि स्फोटाचा जबर धक्का बसल्याने श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाचा दहशतवादी कटाशी संबंध

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा स्फोट एका मोठ्या दहशतवादी कटाच्या साखळीचाच भाग आहे. याच कटाचा तपास पोलीस करत होते. ज्या स्फोटकांची तपासणी सुरू होती, ती हरियाणातील फरिदाबाद येथून आणण्यात आली होती. 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल'च्या तपासादरम्यान हा साठा जप्त करण्यात आला होता.

या जप्त केलेल्या स्फोटकांनी 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल'चा पर्दाफाश केला होता. हे मॉड्युल जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंदशी संबंधित होते आणि काश्मीर, हरियाणा व उत्तर प्रदेशात पसरले होते. तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वी अटक केलेला डॉक्टर मुझम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून ३६० किलो रसायने (अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर) जप्त केली होती.

'पोस्टर्स'पासून 'डॉक्टरां'पर्यंतचा तपास

हे संपूर्ण दहशतवादी मॉड्युल ऑक्टोबरच्या मध्यात नौगाममधील बुनपोरा येथे दिसलेल्या धमकीच्या पोस्टर्समुळे पोलिसांच्या रडारवर आले. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीमुळे तीन संशयित (आरिफ निसार दार, यासिर-उल-अश्रफ आणि मकसूद अहमद दार) ओळखता आले. त्यांच्या चौकशीतून मौलवी इरफान अहमद याचे नाव समोर आले. तो वैद्यकीय समुदायातील ओळखीचा फायदा घेऊन तरुण डॉक्टरांना कट्टरपंथी बनवत होता.

हा तपास पुढे फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठापर्यंत पोहोचला. तेथे डॉ. मुझम्मिल अहमद गनई आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली. पोलिसांचा विश्वास आहे की, या मॉड्युलचा मुख्य कणा तीन डॉक्टर होते: डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. उमर नबी आणि डॉ. मुझफ्फर राथेर.

दिल्ली स्फोटाशीही संबंध

हा (नौगाममधील) स्फोट दिल्लीतील भीषण कार स्फोटानंतर चार दिवसांनी झाला आहे. दिल्ली स्फोटात किमान १३ जण ठार झाले होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार, लाल किल्ल्याजवळील स्फोट झालेली कार याच मॉड्युलचा सदस्य असलेला उमर चालवत होता. एजन्सीच्या सूत्रांनुसार, सुरक्षा दलांच्या यशस्वी कारवाईमुळे उमर घाबरला होता आणि त्याच्या याच भीती आणि नैराश्यामुळे लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला असावा. पोलिसांनी सांगितले की, नौगाममधील हा स्फोट पूर्वनियोजित होता की अपघाती, हे पुढील तपासात निश्चित होईल.