सोमवारी संध्याकाळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे हृदय असलेल्या लाल किल्ला परिसरात, एका भीषण आणि हादरवून टाकणाऱ्या स्फोटाने संपूर्ण देश शोक आणि धक्क्यात बुडाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात आठ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या अमानुष घटनेमुळे देशातील मुस्लिम समाजही खोलवर दुःखी आणि स्तब्ध झाला आहे.
मुस्लिम विचारवंत, धार्मिक विद्वान (आलम-ए-दीन) आणि सामाजिक नेत्यांनी केवळ या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेधच केला नाही, तर दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.
या संवेदनशील काळात, मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींनी देशवासीयांना, विशेषतः मुस्लिमांना, कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे भावनिक आवाहन केले आहे. दिल्ली पोलीस प्रशासन या घटनेबाबत अत्यंत दक्ष असून, सीमा बंद करून कसून तपास करत आहे. स्फोटाची बातमी पसरताच, देशभरातील प्रमुख मुस्लिम व्यक्तींनी एकता, शांतता आणि न्यायाची मागणी करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनी लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटाचा निषेध करताना, याला "माणुसकीची हत्या" म्हटले आहे. गुजरातमधील सुरत येथून बोलताना ते म्हणाले, "मला या घटनेचा निषेध करायचा आहे. निष्पाप लोक मरण पावले आहेत... ही हत्या आहे. मुस्लिम समाजातील सदस्यांची नावे समोर आणली जात आहेत. इस्लामला बदनाम केले जात आहे."
शाही इमाम अहमद बुखारी यांनी लाल किल्ल्याजवळील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, अतिरेक्यांचा कोणताही धर्म नसतो. "देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन, मुस्लिम समुदाय या कठीण काळात आपल्या देशबांधवांसोबत एका अभेद्य भिंतीसारखा उभा आहे. मी पीडित कुटुंबांप्रती तीव्र सहानुभूती व्यक्त करतो." त्यांनी आशा व्यक्त केली की, राष्ट्रीय नेतृत्व दोषींना आणि त्यांच्या सूत्रधारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
इंडियन मुस्लिम्स फॉर प्रोग्रेस अँड रिफॉर्म्स (IMPAR) ने या स्फोटाबद्दल तीव्र चिंता आणि दुःख व्यक्त केले. "ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. IMPAR सरकार, कायदा-सुव्यवस्था आणि देशाच्या शांतताप्रिय नागरिकांसोबत उभे आहे. आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि या घृणास्पद कृत्याच्या गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण पाठिंबा देतो."
"अशा हिंसक घटना केवळ देशाच्या सामाजिक प्रतिष्ठेलाच बाधा आणत नाहीत, तर जागतिक प्रतिमेलाही धक्का पोहोचवतात आणि आर्थिक प्रगतीत अडथळा आणतात," असेही संघटनेने म्हटले आहे. IMPAR ने सरकारला या प्रकरणाची सखोल आणि गंभीर चौकशी करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून केवळ गुन्हेगारच नव्हे, तर त्यांच्यामागील सूत्रधार, विचारवंत आणि समर्थकही पकडले जातील.
सिटिझन्स फॉर फ्रॅटर्निटी (CFF) ने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय मुस्लिम सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने उभे आहेत. या निवेदनावर दिल्लीचे माजी नायब राज्यपाल डॉ. नजीब जंग, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीर उद्दीन शाह आणि उद्योगपती सईद मुस्तफा शेरवानी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
CFF च्या निवेदनात म्हटले आहे, "आम्ही, काही चिंतित भारतीय मुस्लिम, ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटाचा तीव्र निषेध करतो. हे घृणास्पद कृत्य आपल्या राष्ट्रावर आणि प्रत्येक भारतीयाच्या सामायिक वारशावर हल्ला आहे. मुस्लिम म्हणून, आम्ही या अमानवीय कृत्याचा पूर्णपणे निषेध करतो." निवेदनात पुढे म्हटले आहे की, "अशा गुन्ह्यांना कोणत्याही समुदायाशी किंवा आमच्या काश्मिरी बांधवांशी जोडले जाऊ शकत नाही, ज्यांनी स्वतः अतोनात दुःख सोसले आहे आणि ते भारतीय कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत."
मुस्लिम वर्ल्ड लीग (MWL) या जागतिक इस्लामिक संस्थेनेही दिल्ली स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. मक्कास्थित या संस्थेने म्हटले आहे की, "भारतीय राजधानी नवी दिल्लीच्या मध्यभागी झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटाचा आम्ही निषेध करतो."
MWL चे महासचिव आणि 'ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लिम स्कॉलर्स'चे अध्यक्ष शेख डॉ. मोहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा यांनी या 'अमानुष दहशतवादी कृत्याचा' निषेध केला. त्यांनी MWL ची ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट केली की, MWL आणि तिच्या छत्राखालील सर्व मुस्लिम लोक, हिंसाचार आणि दहशतवादाच्या सर्व प्रकारांना ठामपणे नाकारतात.
इंटरनॅशनल सुफी कारवाँचे प्रमुख मुफ्ती मंजूर झिआई (मुंबई) म्हणाले, "दिल्लीतील हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशाच्या विवेकाला हादरवले आहे. दहशतवादाला कोणताही धर्म, समुदाय किंवा पंथ नसतो. तो माणुसकीच्या शत्रूंचे शस्त्र आहे." त्यांनी मुस्लिम समुदायाला आणि विशेषतः तरुणांना आवाहन केले की, "द्वेषाचे उत्तर द्वेषाने देऊ नका - ते एकता, शहाणपण आणि बंधुभावाने दिले पाहिजे. दहशतवाद्यांना आपण विभागलेले आणि एकमेकांबद्दल संशय घेणारेच हवे असते. आपण त्यांचा हा हेतू पराभूत केला पाहिजे."
मजलिस-ए-उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना सय्यद कल्बे जवाद नक्वी यांनी स्फोटाचा निषेध करताना सांगितले की, "ज्या घटना घडल्या आहेत त्या अत्यंत दुःखद आणि निंदनीय आहेत आणि माणुसकीला लाज आणणाऱ्या आहेत. जे निष्पाप लोकांची हत्या करतात, त्यांना कधीही मुस्लिम मानता येणार नाही; इस्लाम निष्पाप लोकांच्या हत्येची परवानगी देत नाही."
जमिअत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी म्हणाले की, ते या दुःखद स्फोटाबद्दल "अत्यंत दुःखी आणि व्यथित" आहेत. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे, एकता टिकवून ठेवण्याचे आणि कोणत्याही अपुष्ट बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले की, "अशा वेळी, जेव्हा देशाला शांतता आणि सलोख्याची सर्वात जास्त गरज आहे, तेव्हा विभाजनकारी शक्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणे आहे." त्यांनी सांगितले की, "ही घटना घातपात होती की अपघात, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, समाजकंटक याचा गैरवापर करू शकतात. अशा अस्पष्ट स्थितीत, समाज धुरीणांनी सतर्क आणि समंजस भूमिका घेतली पाहिजे, पोलीस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे आणि अफवांवर लक्ष ठेवले पाहिजे. केवळ एकजूट होऊनच आपण या विभाजनकारी शक्तींवर नियंत्रण ठेवू शकतो."
पुण्याच्या गुलशन-ए-घरीब नवाज मस्जिदचे इमाम मौलाना मुहम्मद तौफिक अशरफी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. "ही कसली माणुसकी आहे," त्यांनी विचारले, "की निष्पाप आणि निरपराध लोकांना अशा प्रकारे मारले जाते?" इस्लाम आणि इतर सर्व धर्म अशा क्रूरतेला मनाई करतात, असे ते म्हणाले.