फिलिपिन्सवर महासंकट! १ लाखांहून अधिक लोक बेघर

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

मनिला (फिलिपिन्स)

'फुंग-वॉन्ग' चक्रीवादळाने रविवारी (९ नोव्हेंबर २०२५) 'सुपर टायफून'चे (महा-चक्रीवादळ) रूप धारण केले आहे. ते आजच किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे मुसळधार पाऊस, विनाशकारी वारे आणि समुद्राच्या लाटा उसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फिलिपिन्सने आपल्या पूर्व आणि उत्तरेकडील प्रदेशांमधून १ लाखांहून अधिक रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

फिलिपिन्सच्या मोठ्या भागांमध्ये वादळाच्या इशाऱ्याचे संकेत (Storm alert signals) देण्यात आले आहेत. दक्षिण-पूर्व लुझोन, कॅटंडुआनेस आणि कॅमारिन्स नॉर्टे व कॅमारिन्स सूरच्या किनारपट्टी भागांसाठी 'सिग्नल क्र. ५' (Signal No. 5) हा सर्वोच्च धोकादायक इशारा जारी करण्यात आला आहे. तर मेट्रो मनिला आणि आसपासच्या परिसरांना 'सिग्नल क्र. ३' अंतर्गत ठेवण्यात आले आहे.

'फुंग-वॉन्ग', जे स्थानिकरित्या 'उवान' (Uwan) म्हणून ओळखले जाते, या सुपर टायफूनमध्ये १८५ किमी प्रति तास (११५ मैल प्रति तास) वेगाने वारे वाहत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग २३० किमी प्रति तासापर्यंत जात आहे. हे वादळ आज (रविवार) रात्री मध्य लुझोनच्या औरोरा प्रांतात धडकण्याचा अंदाज आहे. पूर्व विसायसच्या काही भागांमध्ये आधीच वीजपुरवठा खंडित झाला आहे.

कॅमारिन्स सूरमधील फिलिपिन्स कोस्ट गार्डने काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यात खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरित केलेले लोक आपल्या पिशव्या आणि वैयक्तिक सामान घेऊन अरुंद बोटींमधून उतरून, वाट पाहत असलेल्या ट्रक्समध्ये बसताना दिसत आहेत.

३०० उड्डाणे रद्द

नागरी विमान वाहतूक नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, ३०० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

'ABS-CBN न्यूज'ने 'X' वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये कॅटंडुआनेस प्रांतातील वादळी परिस्थिती दिसत आहे. त्यात ढगाळलेले आकाश, वाऱ्याने वेगाने हेलकावणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि जोरदार पाऊस कोसळत असल्याचे स्पष्ट दिसत असून, पावसाचा आवाजही ऐकू येत आहे.

फिलिपिन्स 'कलमागी' (Typhoon Kalmaegi) चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरत नाही, तोच 'फुंग-वॉन्ग'ने धडक दिली आहे. 'कलमागी'मुळे फिलिपिन्समध्ये २०४ लोकांचा मृत्यू झाला होता आणि मोठा विनाश झाला होता. त्यानंतर हे वादळ व्हिएतनामला धडकले, जिथे आणखी पाच जणांचा बळी घेतला आणि किनारपट्टीवरील वस्त्या उद्ध्वस्त केल्या.

मध्य व्हिएतनाममधील वुंग चेओ या मच्छीमार गावात, मासेमारीच्या बोटींचे ढिगारे शनिवारी मुख्य रस्त्यावर पडलेले दिसले. येथील शेकडो लॉबस्टर फार्म्स (शेती) एकतर वाहून गेले किंवा त्यांचे मोठे नुकसान झाले.